

Doha Diamond League 2025 Neeraj Chopra best throws |
दिल्ली : दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेता भारताचा 'गोल्डन बॉय' भालाफेकपटू नीरज चोप्राने शुक्रवारी दोहा डायमंड लीगमध्ये इतिहास रचला. त्याने ९०.२३ मीटर भाला फेकला आणि दुसरे स्थान पटकावले. त्याने त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच हा आकडा गाठला. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने त्याच्यापेक्षा जास्त लांब भाला (९१.०६) फेकून पहिला क्रमांक पटकावला.
नीरज ९० मीटर अंतर लांब भाला फेकणारा जगातील २५ वा आणि आशियातील तिसरा खेळाडू ठरला. त्याचवेळी, वेबरने पहिल्यांदाच ९० मीटरचा टप्पा ओलांडला आणि तो सहावा खेळाडू बनला. पॅरिस ऑलिंपिक विजेता पाकिस्तानचा अर्शद नदीम (९२.९७ मीटर) आणि चायनीज तैपेईचा चाओ सुन चेंग (९१.३६ मीटर) हे ९० मीटरपेक्षा जास्त लांब भाला फेकणारे एकमेव आशियाई खेळाडू आहेत. अंतराच्या बाबतीत नीरज या २६ खेळाडूंमध्ये २४ व्या स्थानावर आहे.
सध्याच्या खेळाडूंमध्ये, नीरज चोप्रा, ज्युलियन वेबर, जाकुब वडलेच आणि मॅक्स डेहनिंग यांनी अलिकडच्या स्पर्धांमध्ये ९० मीटरपेक्षा जास्त लांब भाला फेकण्याचा विक्रम केला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या भालाफेकीत, जर्मनी, फिनलंड आणि झेक प्रजासत्ताक सारख्या देशांनी काही सर्वोत्तम भालाफेकपटू तयार केले आहेत. ९० मीटर अंतर कापलेल्या खेळाडूंमध्ये अनेक जर्मन खेळाडू पहिल्या १० मध्ये स्थान मिळवतात. यामध्ये जोहान्स वेटर, थॉमस रोहलर आणि रेमंड हेच्ट यांचा समावेश आहे. आता वेबरचेही नाव त्यात समाविष्ट झाले आहे. अंतराच्या बाबतीत वेबर १७ व्या क्रमांकावर आहे. शुक्रवारी दोहा डायमंड लीगमध्ये त्याने सहाव्या प्रयत्नात ९१.०३ मीटर लांबी गाठली.
सर्वात लांब भालाफेकचा जागतिक विक्रम नीरजचे सध्याचे प्रशिक्षक यान झेलेझनी यांच्या नावावर आहे. झेलेझनीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये नीरजला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि तीन महिन्यांतच भारताच्या गोल्डन बॉयने ९० मीटरचा टप्पा ओलांडला. झेलेझनी ही तीन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन देखील आहे. १९९२, १९९६ आणि २००० च्या ऑलिंपिक खेळांमध्ये सुवर्णपदक विजेत्या झेलेझनीने आतापर्यंतच्या टॉप टेन सर्वोत्तम थ्रोपैकी पाच थ्रोमध्ये स्थान मिळवले आहे. १९९६ मध्ये, त्याने जर्मनीमध्ये ९८.४८ मीटर फेकून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. त्याने चार वेळा जागतिक विक्रम मोडला. झेलेझनीने यापूर्वी जाकुब वडलेच आणि विटेझस्लाव वेसेली यांनाही प्रशिक्षण दिले आहे. त्यांनी दोन वेळा ऑलिंपिक विजेता आणि तीन वेळा विश्वविजेती बार्बोरा स्पाटकोवाला प्रशिक्षण दिले आहे.
नीरजने एका मुलाखतीत सांगितले होते की, पॅरिस ऑलिंपिकचे व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रशिक्षक झेलेझनी यांनी त्याला २ कमतरता दाखवून दिल्या होत्या. त्याने नीरजच्या तंत्रातही काही बदल केले होते, ज्याचा उल्लेख नीरजने एका मुलाखतीत केला होता. पॅरिस ऑलिंपिकमध्ये तो भाला खूप खाली फेकत होता, ज्यामुळे तो लांब फेकला गेला नाही. भाला फेकताना तो डावीकडे झुकला होता. त्यामुळे जास्त ताकद लावता आली नाही.
दोहा डायमंड लीग २०२५ :
नीरजने अखेर ९० मीटरचा टप्पा पार करत ९०.२३ मीटरचा थ्रो केला. हा त्याचा कारकिर्दीतील सर्वोत्तम थ्रो ठरला.
स्टॉकहोम डायमंड लीग २०२२ :
स्वीडनमध्ये ८९.९४ मीटर थ्रो करत नीरजने सुवर्णपदक पटकावले. याआधी फिनलंडमधील पावो नुर्मी गेम्समध्ये ८९.३० मीटर हा वैयक्तिक सर्वोत्तम थ्रो होता.
पॅरिस ऑलिंपिक फायनल २०२४ :
नीरजने फायनलमध्ये ८९.४५ मीटरचा थ्रो करत कारकिर्दीतील दुसरा सर्वोत्तम थ्रो केला. मात्र त्यानंतर त्याचे इतर थ्रो अमान्य ठरले.
दोहा डायमंड लीग २०२३ :
नीरजने ८८.६७ मीटरचा थ्रो करत पहिल्याच प्रयत्नात सुवर्ण पदक जिंकले.
विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ :
८८.१७ मीटर थ्रो करत नीरजने सुवर्ण पदक जिंकले आणि पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्रता मिळवली. या स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला.
विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२ :
८८.१३ मीटरचा थ्रो करत नीरजने रौप्य पदक जिंकले. अशा प्रकारे या स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय अॅथलीट ठरला.
एशियन गेम्स २०१८ :
नीरजने ८८.०६ मीटरचा थ्रो करत भारतासाठी सुवर्ण पदक मिळवले.
डायमंड लीग फायनल २०२० (ब्रसेल्स):
८७.८६ मीटरचा थ्रो करत नीरज दुसऱ्या स्थानावर राहिला. थोडक्यात विजेतेपद हुकले.
लुसान डायमंड लीग २०२३ :
पाचव्या प्रयत्नात ८७.६६ मीटरचा थ्रो करत नीरजने थेट सुवर्ण पदकावर कब्जा केला.
टोकियो ऑलिंपिक २०२० :
नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटरचा थ्रो करत भारतासाठी ट्रॅक अॅण्ड फील्डमधील पहिले ऑलिंपिक सुवर्ण पदक पटकावले.