

Mohammed Siraj
लंडन : भारताने ओव्हलवर इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या पाचव्या कसोटीत ६ धावांनी थरारक विजय मिळवला आणि या विजयाचा केंद्रबिंदू ठरला मोहम्मद सिराज. त्याच्या या अविश्वसनीय कामगिरीनंतर इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनीही या वेगवान गोलंदाजाच्या दृढनिश्चयाचे आणि सामना जिंकून देणाऱ्या कामगिरीचे तोंडभरून कौतुक केले आहे. भारताचा कसोटीतील प्रमुख गोलंदाज बनण्यापर्यंतचा सिराजचा प्रवास सोपा नव्हता. त्यागातून घडलेल्या सिराजची बिर्याणीची गोष्ट माहीत आहे का?
"जेव्हा सिराजने ती शेवटची विकेट घेतली, तेव्हा आम्ही प्रचंड निराश झालो होतो. पण त्याचवेळी, त्याच्याबद्दल आणि एक क्रिकेटपटू म्हणून त्याच्यातील लढवय्या वृत्तीबद्दल माझ्या मनात प्रचंड कौतुक दाटून आले होते. त्याने जे करून दाखवले ते खरंच वाखाणण्याजोगे आहे," असे मॅक्युलम म्हणाले. हैदराबादच्या ३१ वर्षीय सिराजने या सामन्यात एकूण ९ बळी घेतले, ज्यात अंतिम डावातील ५/१०४ च्या आक्रमक स्पेलचा समावेश आहे. यासह, तो २३ बळी मिळवून या मालिकेतील सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला.
या प्रवासात त्याने क्रिकेटच्या मैदानापलीकडेही अनेक त्याग केले आहेत. २०१९ मध्ये, त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याने फिटनेससाठी आपली आवडती बिर्यानीही खात नाही. हैदराबादमध्ये सराव सत्रानंतर टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सिराज म्हणाला होता, "मी बिर्याणी खाणे बंद केले आहे. आता ती माझ्यासाठी 'चीट मील' झाली आहे. खरं सांगायचं तर, जर तुम्हाला देशाचे प्रतिनिधित्व करायचे असेल, तर तुम्हाला काही गोष्टींचा त्याग करावाच लागतो."