

T20 World Cup 2026 Super 8 IND vs RSA: भारतात सुरू असलेल्या टी २० वर्ल्डकप २०२६ चा सुपर ८ चा राऊंड सुरू होत आहे. भारताचा सुपर ८ मधील पहिला सामना हा दक्षिण अफ्रिकेसोबत होणार आहे. यापूर्वी भारतीय संघाने नेटमध्ये घाम गाळला. या नेट सेशनवेळी भारताचं टेन्शन वाढवणारी एक घडना घडली. शुक्रवारी, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला नेटमध्ये सराव करत असताना चेंडू लागला. त्यामुळं तो जबर जखमी झाला आहे.
यंदाच्या टी २० वर्ल्डकपमध्ये भारताला दुखापतींचे ग्रहण लागलं आहे. हर्षित राणाला दुखापत झाल्यामुळं शेवटच्या क्षणी मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आलं. हर्षित राणा हा संपूर्ण स्पर्धेलाच मुकला आहे. त्याची रिप्लेसमेंट म्हणून संघात आलेला मोहम्मद सिराजने आतापर्यंत फक्त एकाच सामन्यात प्लेईंग ११ मध्ये खेळला आहे. आता त्याला दुखापत झाल्यानं संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढली आहे.
रेव्ह स्पोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार नेटमध्ये सराव करत असताना मोहम्मद सिराज हा हार्दिक पंड्याला गोलंदाजी करत होता. त्यावेळी हार्दिक पंड्याने एक जोरदार फटका मोहम्मद सिराजच्या दिशेने मारला. चेंडू थेट सिराजच्या गुडघ्याला जाऊन आदळला. त्यामुळं सिराज मैदानावर पडला. यानंतर सिराजला खूप वेदना होत असल्यानं त्यानं मैदान सोडलं.
मोहम्मद सिराजनं टी २० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियात पुनरागमन केल्यानंतर युएसएविरूद्धचा सामना खेळला. या सामन्यात त्यानं दमदार कामगिरी करत २९ धावात ३ बळी टिपले. मात्र यानंतर मोहम्मद सिराजला प्लेईंग ११ मध्ये खेळण्याची संधीच मिळाली नाही.
सिराजला नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्स विरूद्धच्या सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. सुपर ८ मध्ये देखील भारतीय संघ प्लेईंग ११ मध्ये जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग सोबतच जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं मोहम्मद सिराजला सुपर ८ मधील सामन्यात देखील प्लेईंग ११ मध्ये जागा मिळण्याची शक्यता नाही. असं असलं तरी भारताच्या १५ च्या संघात मोहम्मद सिराजचा एकमेव बॅक-अप वेगवान गोलंदाज म्हणून समावेश आहे.
अभिषेक शर्मा, इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, अर्शदीप सिंह, वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
राखीव खेळाडू
संजू सॅमसन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर