

T20 World Cup 2026 Super 8: जो संघ २०२४ च्या आयसीसी पुरूष टी २० वर्ल्डपकसाठी साधा पात्र झाला नव्हता त्या झिम्बाब्वे संघानं यंदाच्या टी २० वर्ल्डकप २०२६ मध्ये जबरदास्त कामगिरी करत सुपर ८ मध्ये धडक मारली आहे. एक काळ असा होता की झिम्बब्वेला युगांडानं देखील मात दिली होती. त्यांना टी २० क्रिकेटमध्ये २१ व्या स्थानावर रहावं लागलं होतं. मात्र आता सिकंदर रझाच्या नेतृत्वाखालील संघानं अख्खा क्रिकेट जगताला तोंडात बोडं घालायला लावली आहेत.
ज्यावेळी टी २० वर्ल्डकपचे शेड्युल जाहीर झालं त्यावेळी कोणाचं झिम्बाब्वे संघाकडं लक्ष गेलं असेल असं वाटत नाही. ग्रुप B मध्ये असलेली झिम्बाब्वे सुपर ८ मध्ये पात्र होईल असा अंदाज कोणत्याही शाहण्या माणसाला लावता आला नव्हता. सर्वजण श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांची नावं घेत धोपट मार्गच निवडत होते. मात्र झिम्बाब्वेनं या सर्वांना आडमार्गावर नेलं. मात्र झिम्बाब्वेनं ओमानला गिळलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची मोठी शिकार करत आपली भूक वाढली असल्याचं दाखवून दिलं. या विजयानंतर झिम्बाब्वेनं सुपर ८ मधील आपली जागा पक्की केली. इतिहासात पहिल्यांदाच झिम्बाब्वे सुपर ८ मध्ये पोहचली.
चला इथं झिम्बाब्वेचा थक्क प्रवास संपेल असं वाटलं असेल. मात्र झिम्बाब्वेनं यजमान श्रीलंकेला देखील पराभवाच्या खाईत लोटत ग्रुप B मध्ये अव्वल स्थान पटकावलं. झिम्बाब्वेची ही कामगिरी खास होती. कारण ती श्रीलंकेत केली गेली होती. झिम्बाब्वेनं श्रीलंकेचे १७९ धावांचे आव्हान पार केलं. झिम्बाब्वेची फलंदाजी तसेच वेगवान गोलंदाजी देखील आपला दम दाखवत आहे.
झिम्बाब्वेनं ग्रुप स्टेजमधील आपले सर्व सामने जिंकत भारतासारखीच कामगिरी केली आहे. आता ते थाटात सुपर ८ मध्ये पोहचले असून ते तिथंही धमाका करण्यासाठी सज्ज झाले आहेत. झिम्बाब्वे आक्रमक फलंदाजी करत असून टार्गेट कोणतेही असो दबावात न येता ते पार करण्यासाठी जोर लावत आहे. गोलंदाजीत देखील मुझरबानी, ब्रॅड इव्हान्स हे वेगवान गोलंदाज भेदक मारा करत आहेत. मुझरबानीने आतापर्यंत ९ तर इव्हान्सने ८ विकेट्स घेतल्या आहेत.
झिम्बाब्वेसाठी श्रीलंका फायदेशीर ठरलं. आता ते सुपर ८ मधील आपले सामने हे भारतात खेळणार आहेत. सुपर ८ मध्ये त्यांचा मुकाबला बलाढ्य वेस्ट इंडीज, दक्षिण अफ्रिका आणि भारतासोबत आहे. भारतात ते आपली ही दैदिप्यमान घोडदौड कायम ठेवू शकणार का? याचं उत्तर का नाही असं आहे. भारतीय खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्यासाठी त्यांचे फलंदाज सज्ज आहेत. त्यामुळे झिम्बब्वे नक्कीच या तीनपैकी कोणत्याही संघाला मोठा अपसेट देऊ शकतात.
सिकंदर रझाच्या या संघाची भारतातील कामगिरी चांगली राहिली आहे. मात्र त्यांना फलंदाजीत दमदार कामगिरी करून दाखवायला हवी. त्यांचे वेगवान गोलंदाज दर्जेदार आहेत. मात्र फिरकीला देखील त्यांना चांगल्या प्रकारे कॉन्ट्रिब्युट करता आलं पाहिजे. फिरकीमध्ये रझा, ग्रॅमी क्रेमर आणि रायन बुर्ल हे चांगले फिरकीपटू त्यांच्याकडे आहेत. रझा हा भारताच्या आणि दक्षिण अफ्रिकेच्या डावखुऱ्या फलंदाजांना टेन्शन देऊ शकतो. भारतीय संघ यंदाच्या वर्ल्डकपमध्ये ऑफ स्पिनरविरूद्ध संघर्ष करताना दिसत आहे.
झिम्बाब्वेविरूद्ध एकच गोष्ट जाते ती म्हणजे झिम्बाब्वेची रझा आणि ब्रायन बेन्नेटवर असलेली डिपेंडसी. गेल्या दोन वर्षापासून बेन्नेट आणि रझा यांनी टी २० क्रिकेटमधील संघाच्या जवळपास ३८ टक्के धावा केल्या आहेत. यंदाच्या टी २० वर्ल्डकपमध्ये बेन्नेटने झिम्बाब्वेच्या ३९ टक्के म्हणजे ४५७ धावा केल्या आहेत. रझा देखील मॅच विनिंग इनिंग खेळण्यात तरबेज आहे.
जरी झिम्बाब्वेची फलंदाजी या दोघांवर अवलंबून तरी सुपर ८ मध्ये झिम्बाब्वे धमाकेदार कामगिरी करू शकत नाही असं नाही. ते सुपर ८ मध्ये देखील कोणत्या ना कोणत्या तगड्या संघाला धक्का देऊ शकतात. वेस्ट इंडीज जरी जिंकत असले तरी त्यांची कामगिरी आश्वासक नाही. दक्षिण अफ्रिका दबावात कोसळतो. भारताबद्दल बोलायचं झालं तर भारत आतापर्यंत पूर्ण क्षमतेनं खेळू शकलेला नाही. त्यामुळं हे तीनही संघ झिम्बाब्वेविरूद्ध संघर्ष करू शकतात.