Cricket Doping Case : क्रिकेट विश्वात खळबळ! पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाज 'ड्रग्ज टेस्ट'मध्ये पॉझिटिव्ह; PCB कडून चौकशी सुरू

Pakistan cricket controversy : मैदानात अपयश, मैदानाबाहेर 'कलंक'! नवाजच्या एका चुकीमुळे पाकिस्तान क्रिकेटची नाचक्की
Cricket Doping Case : क्रिकेट विश्वात खळबळ! पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाज 'ड्रग्ज टेस्ट'मध्ये पॉझिटिव्ह; PCB कडून चौकशी सुरू
Published on
Updated on

इस्लामाबाद : पाकिस्तान क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू आणि अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाज अमली पदार्थ चाचणीत (ड्रग्ज टेस्ट) दोषी आढळल्याने खळबळ माजली आहे. या गंभीर प्रकरणामुळे नवाज आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) चौकशीच्या फेऱ्यात अडकला असून, त्याच्या क्रिकेट कारकिर्दीवर टांगती तलवार निर्माण झाली आहे.

नेमके प्रकरण काय?

नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषक २०२६ दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) खेळाडूंची उत्तेजक चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यामध्ये मोहम्मद नवाजचा नमुना 'पॉझिटिव्ह' आढळला आहे. आयसीसीने यासंदर्भातील अधिकृत माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला कळवली आहे. पीसीबीने या प्रकरणाची तातडीने दखल घेत अंतर्गत चौकशी सुरू केली असून, २२ एप्रिल रोजी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल आयसीसीला सादर केला जाणार आहे.

इंग्लंडमधील 'टी-२० ब्लास्ट' स्पर्धेला मुकणार

या प्रकरणामुळे मोहम्मद नवाजला मोठा आर्थिक आणि व्यावसायिक फटका बसला आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या प्रतिष्ठेच्या 'टी-२० ब्लास्ट' स्पर्धेसाठी नवाजने 'सरे' (Surrey) या संघासोबत करार केला होता. या स्पर्धेसाठी पीसीबीने त्याला दोन आठवड्यांपूर्वीच ना हरकत प्रमाणपत्र (NOC) दिले होते. मात्र, आता चौकशी प्रलंबित असल्याने त्याला इंग्लंडला जाता येणार नाही. सरे या संघाकडून त्याच्या समावेशाची अधिकृत घोषणा याच आठवड्यात होणार होती, परंतु या ताज्या घडामोडींमुळे नवाजच्या सहभागावर पूर्णविराम लागला आहे.

विश्वचषकातील निराशाजनक कामगिरी

फेब्रुवारी-मार्च दरम्यान श्रीलंका आणि भारत येथे खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषकात नवाजचा सहभाग होता. या स्पर्धेत पाकिस्तानचा प्रवास 'सुपर-८' फेरीपर्यंतच मर्यादित राहिला. नवाजची वैयक्तिक कामगिरीही अत्यंत सामान्य झाली होती; त्याने संपूर्ण स्पर्धेत केवळ १५ धावा केल्या आणि ७ बळी घेतले. सध्या तो पाकिस्तान सुपर लीगच्या (PSL) ११ व्या हंगामात 'मुलतान सुल्तान्स'कडून खेळत होता, तिथेही त्याला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही.

या प्रकरणावर अद्याप मोहम्मद नवाज किंवा सरे कौंटी क्रिकेट क्लबकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पीसीबीच्या चौकशीत नवाज दोषी आढळल्यास त्याच्यावर दीर्घकालीन बंदीची कारवाई होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news