

Mithun Manhas elected as new BCCI president : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी माजी दिल्ली क्रिकेटपटू मिथुन मनहास यांची अधिकृत निवड झाली आहे. रविवारी, २८ सप्टेंबर रोजी मुंबईत पार पडलेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. माजी अध्यक्ष रोजर बिन्नी यांचा कार्यकाळ मागील महिन्यात संपुष्टात आला होता, त्यानंतर ही जागा रिक्त होती.दरम्यान, मनहास यांची अध्यक्षपदी निवड ही जम्मू-कश्मीरसारख्या दुर्गम भागातील खेळाडूसाठी एक ऐतिहासिक टप्पा मानली जात आहे. मिथुन मनहास हे या पदावर निवडले जाणारे जम्मू-कश्मीरमधून पहिलेच खेळाडू ठरले आहेत.
मनहास यांच्यासोबतच अन्य पदाधिकाऱ्यांचीही निवड करण्यात आली आहे. राजीव शुक्ला यांची उपाध्यक्षपदी, देवाजित सैकिया यांची सन्माननीय सचिवपदी, तर प्रभतेज सिंग भाटिया यांची संयुक्त सचिवपदी निवड झाली आहे. मंडळाच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी ए. रघुराम भट यांच्याकडे कोषाध्यक्ष म्हणून सोपवण्यात आली आहे. जयदेव निरंजन शहा यांची 'एपेक्स कौन्सिल'चे एकमेव सदस्य म्हणून निवड करण्यात आली. अरुण सिंग धूमल आणि एम. खैरूल जामाल माजूमदार यांची गव्हर्निंग कौन्सिलमध्ये नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीबाबत प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग म्हणाले, “मिथुन मनहास यांची अधिकृतपणे बीसीसीआय अध्यक्षपदी निवड झाल्याचा क्षण ऐतिहासिक आहे. माझ्या जन्मभूमी असलेल्या डोडा जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा दिवस आहे. काही तासांपूर्वी किश्तवाडच्या शीतलने जागतिक विजेतेपद पटकावले आणि त्यानंतर मिथुन यांची बीसीसीआय अध्यक्षपदी निवड झाली. दोन मोठी बातम्या एकाच दिवशी मिळणे हे नक्कीच जम्मू-कश्मीरसाठी मोठे यश आहे.”
मिथुन मनहास यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९७९ रोजी झाला. ते मूळचे जम्मू-कश्मीर राज्यातील आहेत. त्यांना राष्ट्रीय संघात स्थान न मिळालं असलं, तरी त्यांच्या सातत्यपूर्ण आणि परिपक्व कामगिरीमुळे ते एक विश्वासार्ह खेळाडू म्हणून ओळखले गेले. उजव्या हाताचे फलंदाज असलेल्या मनहास यांनी गरज पडल्यास फिरकीपटू म्हणूनही कामगिरी बजावली. तसेच यष्टीरक्षणाचीही भूमिका बजावली. त्यांनी दिल्ली संघाचे नेतृत्व केले. विशेष म्हणजे, त्यांनी दिल्लीचा कर्णधार असताना एक तरुण विराट कोहली संघात पदार्पण करत होता. १८ वर्षांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत मनहास यांनी १५७ सामन्यांमध्ये ९,७१४ धावा केल्या आहेत. त्यांच्या नावावर २७ शतके आणि ४९ अर्धशतके असून सरासरी ४६ इतकी आहे. आयपीएलमध्ये त्यांनी दिल्ली डेअरडेव्हिल्स (२००८-२०१०), पुणे वॉरियर्स (२०११-२०१३) आणि चेन्नई सुपर किंग्स (२०१४) या तीन संघांचे प्रतिनिधित्व केले. दिल्ली व जम्मू-कश्मीरच्या संघांतून देशांतर्गत क्रिकेट खेळून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती.
बीसीसीआय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मिथुन मनहास माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "ही एक मोठी जबाबदारी आहे. मी माझ्या क्षमतेनुसार, समर्पणानुसार आणि उत्कटतेने ती पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध राहीन. बीसीसीआय हे जगातील सर्वोत्तम बोर्ड आहे. आमच्याकडे सर्वोत्तम खेळाडू, सर्वोत्तम सुविधाआणि लाखो लोकांचा पाठिंबा आहे. बीसीसीआय आणि भारतीय क्रिकेटला पुढे नेणे हा एकमेव अजेंडा आहे."