Shubman Gill ODI Captain :
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर टीम इंडियाच्या कर्णधारपदाची माळ शुभमन गिलच्या गळ्यात पडली. त्यानंतर टी २० मध्ये देखील त्याला उपकर्णधार करण्यात आलं. यावरून बीसीसीआय शुभमन गिलकडे तीनही फॉरमॅटचा कर्णधार म्हणून पाहत अल्याचे संकेत मिळाले. मात्र मधल्या काळात वनडेसाठी गिलऐवजी श्रेयस अय्यरला वनडेची कॅप्टन्सी दिली जाऊ शकते असे वृत्त आले होते.
भारताचा सध्याचा वनडे कर्णधार रोहित शर्मा हा दीर्घकाळ वनडे क्रिकेट खेळणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये संघ व्यवस्थापनाला नवा कर्णधार शोधावा लागणार आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिका ही रोहित शर्माचा शेवटची वनडे मालिका ठरू शकते. विशेष करून तो कर्णधार म्हणून ही त्याची शेवटची मालिका असण्याची शक्यता आहे.
2027 चा वनडे वर्ल्डकप डोळ्यासमोर ठेवला तर बीसीसीआयची निवडसमिती नवा वनडे कर्णधार तयार करण्यावर अधिक भर देण्याची शक्यता आहे. दरम्यान, रेवस्पोर्ट्सच्या वृत्तानुसार भारताचा नवा वनडे कर्णधार हा शुभमन गिलच असेल याबाबत बीसीसीआयच्या मनात कोणती शंका नाहीये. आता फक्त योग्यवेळी याची घोषणा होणं बाकी आहे.
रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये अजून खेळण्याची इच्छा दर्शवली आहे. तो पुढच्या २०२७ च्या वनडे वर्ल्डकपपर्यंत खेळण्यासाठी उत्सुक आहे. मात्र असं असलं तरी हा निर्णय पूर्णपणे त्याच्या हातात नाहीये. पुढच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रोहित शर्माला उत्तम कामगिरी करावी लागेल. तरच निवडसमिती रोहितबाबत मोठा निर्णय घेण्यापासून परावृत्त होऊ शकते.
सर्व फॉरमॅटसाठी एकच कर्णधार?
शुभमन गिल सध्या कसोटी संघाचं नेतृत्व करत आहे. त्यानं टी २० क्रिकेटमध्ये देखील उपकर्णधार म्हणून अक्षर पटेलला रिप्लेस केलं आहे. योग्य वेळी शुभमन गिल हा सूर्यकुमार यादवची कर्णधार पदाची देखील जागा घेईल. हा निर्णय २०२६ च्या टी २० वर्ल्डकपनंतर घेतला जाऊ शकतो. सूर्यकुमार यादवचं वय सध्या ३४ वर्षे आहे. त्यामुळं भविष्याचा विचार करून शुभमन गिलच्या खांद्यावरच संघाची धुरा देण्यात येईल.
भारतीय क्रिकेटसाठी गेल्या काही काळापासून सर्व फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार हे पारंपरिक धोरण यशस्वी ठरलं आहे. त्यामुळं सिलेक्टर हेच धोरण पुढं कायम ठेवण्याची जास्त शक्यता आहे. २०२७ च्या वर्ल्डकपवेळी रोहित शर्मा हा ४० वर्षाचा झाला असेल. तो फक्त वनडे क्रिकेटच खेळत असेल. त्यामुळं त्याला त्याचा फॉर्म आणि फिटनेस टिकवून ठेवणं कठीण जाणार यात शंका नाही.