Suresh Raina On India vs Pakistan Match Row :
आशिया कपमधील भारत - पाकिस्तान सामन्यादरम्यन भारतीय संघानं अत्यंत कडक भूमिका घेत फक्त सामना खेळला. कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूसोबत कोणतंही संभाषण केलं नाही का हस्तांदोलन केलं नाही. भारतीय संघातील खेळाडू सामना खेळले अन् निघून गेले. भारतीय संघाच्या या पवित्र्यावर आता जोरदार चर्चा होत आहे. हा पवित्रा भारतीय संघानं ठरवून घेतला होता. यामुळं पाकिस्तान संघाला धक्का बसला. आता अशी माहिती समोर येत आहे की भारतीय संघातील एकही खेळाडू पाकिस्तान संघाविरूद्ध खेळण्यास उत्सुक नव्हता.
भारताचा माजी खेळाडू सुरेश रैना स्पोर्ट्स तकशी बोलत होता. त्यावेळी त्यानं दावा केला की, त्याला मिळालेल्या माहितीनुसार भारतीय संघातील एकही खेळाडू हा आशिया कपमध्ये पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात खेळण्यास उत्सुक नव्हता. त्यांनी हा निर्णय बीसीसीआयनं आशिया कपमध्ये खेळण्याचं ठरवलं होतं तेव्हापासूनच घेतला होता. मात्र खेळाडूंसमोर आदेशाचं पालन करण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता.'
रैना या मुलाखतीदरम्यान म्हणाला, 'मला एक गोष्ट नक्की माहिती आहे की जर तुम्ही वैयक्तिकरित्या खेळाडूंन विचाराल तर त्यांना आशिया कपमध्ये खेळायचं नव्हतं. मात्र बीसीसीआय आशिया कप खळण्यास मान्य झालं अन् खेळाडूंना सक्तीनं खेळावं लागलं. भारत पाकिस्तानविरूद्ध खेळला यामुळं मी दुखी आहे. मी असंही म्हणेन की जर तुम्ही सूर्यकुमार यादव आणि संघातील खेळाडूंना त्यांचे वैयक्तिक मत विचाराल तर ते देखील नाही म्हणाले असते. ते देखील खेळण्यास उत्सुक नसते.'
पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर भारत - पाकिस्तान संबंध ताणले गेले. त्यानंतर या वर्षी आशिया कप होण्याची शक्यता देखील कमी झाली होती. मात्र बीसीसीआय आणि इतर क्रिकेट संघटनांनी स्पर्धा खेळवण्यास हिरवा कंदील दाखवला.
बीसीसीआयसमोर पाकिस्तानच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याची देखील संधी होती. मात्र बीसीसीआनं खेळण्याचा निर्णय घेतला. यानंतर सोशल मीडियावर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. विशेष म्हणजे भारतीय संघानं सामना खेळण्यावर लक्ष केंद्रित केलं अन् सामन्यात हस्तांदोलन न करता आपली भूमिका स्पष्ट केली.