श्रीलंकेच्या मिलन रथनायकेने रचला इतिहास, मोडला ४१ वर्षांचा जुना विक्रम
पुढारी ऑनलाईन डेस्क | Milan Rathnayake Created History : श्रीलंकेचा क्रिकेटपटू मिलन प्रियनाथ रथनायकेने इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना, नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वात मोठी खेळी खेळणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू बलविंदर संधू यांच्या नावावर हा विशेष विक्रम नोंदवला गेला होता. 1983 मध्ये हैदराबाद (सिंध) येथे पाकिस्तानविरुद्ध नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्यांनी 71 धावांची खेळी केली होती.
संधूचा हा विश्वविक्रम आता इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत मोडला गेला आहे. 28 वर्षीय श्रीलंकेचा क्रिकेटर मिलन प्रियनाथ रथनायकेने पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 9व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. फलंदाजी करताना त्याने 135 बॉलमध्ये 53.33 च्या स्ट्राइक रेटने 72 धावांची अर्धशतकी खेळी केली. यावेळी त्याने 6 चौकार आणि 2 षटकारही लगावले.
पदार्पणाच्या कसोटीत 9 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना मोठी धावसंख्या करणारे 5 फलंदाज :
मिलन प्रियनाथ रथनायके - 72 धावा - श्रीलंका - विरुद्ध इंग्लंड - मँचेस्टर - 2024
बलविंदर संधू -71 धावा -भारत - विरुद्ध पाकिस्तान - हैदराबाद (सिंध) - 1983
डॅरेन गफ - 65 धावा - इंग्लंड - विरुद्ध न्यूझीलंड - मँचेस्टर - 1994
मोंडे जोंडेकी - 59 धावा - दक्षिण आफ्रिका - विरुद्ध इंग्लंड - लीड्स 2003
विल्फ्रेड फर्ग्युसन - 56 नाबाद - वेस्ट इंडिज - विरुद्ध इंग्लंड - ब्रिजटाऊन - 1948
श्रीलंकेचा डाव 236 धावांवर आटोपला
इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यात श्रीलंकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत पहिल्या डावात 236 धावा केल्या. कर्णधार धनंजय डी सिल्वाने 6व्या क्रमांकावर फलंदाजी करताना संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याने 84 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने 74 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. त्याच्यासह रथनायके ऐतिहासिक फलंदाजी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. गोलंदाजीमध्ये इंग्लंडच्या ख्रिस व्होक्स आणि शोएब बशिर यांनी सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर, गस ऍटकिन्सनने 2 आणि मार्क वूडने 1 विकेट घेतली.
यानंतर इंग्लंडने श्रीलंकेच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 22 धावा केल्या आहेत. संघासाठी बेन डकेट 12 बॉलमध्ये 13 तर आणि डॅनियल लॉरेन्स 12 बॉल 9 धावा करून नाबाद आहे.

