Cricket Records: ७७ चेंडू खेळले, १०१ मिनिटे मैदानात अन् ० धावा; क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात विचित्र रेकॉर्ड माहीत आहे का?
Cricket Records Geoff Allott
नवी दिल्ली : क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. या मैदानात कधी पराक्रम रचले जातात, तर कधी असे काही घडते की जे पाहून चाहते अवाक होतात. असाच एक आगळावेगळा विक्रम न्यूझीलंडच्या एका खेळाडूच्या नावावर आहे, जो आजही अबाधित आहे. ७७ चेंडू खेळून एकही धाव न काढता बाद होण्याचा रेकॉर्ड जेफ अलॉट याने केला होता. आज त्याचा ५४ वा वाढदिवस आहे.
१०१ मिनिटे मैदानावर पण धावसंख्या शून्यच!
ही घटना २६ वर्षांपूर्वीची आहे. ऑकलंडमध्ये दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात सामना सुरू होता. न्यूझीलंडने ३२० धावांवर नऊ विकेट्स गमावल्या होत्या. जेफ अलॉट ११ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. ख्रिस हॅरिस आधीच नाबाद होता. ही जोडी टिकून राहिली, परंतु फक्त हॅरिस धावा करत होता. अलॉटने ७७ चेंडू खेळले, पण नशिबाने साथ दिली नाही आणि एकही धाव न काढता तो बाद झाला. १०१ मिनिटे तो खेळपट्टीवर झुंजत राहिला. मिनिटांच्या हिशोबात हा क्रिकेट इतिहासातील सर्वात प्रदीर्घ 'डक' ठरला.
अँडरसन दुसऱ्या क्रमांकावर
सर्वात जास्त वेळ शून्यावर राहण्याच्या या यादीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन दुसऱ्या क्रमांकावर आहे. २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने ८१ मिनिटे आणि ५५ चेंडू खेळून शून्यावर आपली विकेट गमावली होती. याव्यतिरिक्त रिचर्ड एलीसन आणि पीटर सच यांनीही ५० पेक्षा अधिक चेंडू खेळून शून्यावर बाद होण्याची नोंद केली आहे.
१९९९ च्या विश्वचषकातील 'हिरो'
जेफ अलॉट यांने १९९६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो केवळ त्याच्या 'डक'साठी प्रसिद्ध नव्हता, तर एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणूनही ओळखला जायचा. १९९९ च्या विश्वचषकात अलॉटने सर्वाधिक बळी घेतले होते. तो २००० च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या न्यूझीलंड संघाचा सदस्य होता. तसेच १९९८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या संघातही त्याचा समावेश होता. दुखापतींमुळे त्याची कारकीर्द जास्त लांबली नाही आणि २००१ मध्ये वयाच्या ३० व्या वर्षी त्याने क्रिकेटला अलविदा केले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ऐतिहासिक खेळीची पुन्हा एकदा चर्चा होत आहे.

