MI vs RCB | मुंबईच्या मैदानात आरसीबीची बाजी!

सॉल्ट, विराट, पाटीदारची तडफदार अर्धशतके
MI vs RCB |
MI vs RCB | मुंबईच्या मैदानात आरसीबीची बाजी!
Published on
Updated on

मुंबई; वृत्तसंस्था : फिल सॉल्ट (36 चेंडूंत 78), विराट कोहली (38 चेंडूंत 50) व कर्णधार रजत पाटीदार (20 चेंडूंत 53) यांच्या तडफदार अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने मुंबई इंडियन्सला वानखेडेवर त्यांच्या घरच्या मैदानावर अगदी चारीमुंड्या चीत केले. फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी गाजवलेले वर्चस्व मुंबईच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले. आरसीबीने 20 षटकांत 4 बाद 240 धावा केल्यानंतर मुंबईला प्रत्युत्तरात 5 बाद 222 धावांवर समाधान मानावे लागले. मुंबईसाठी हा 4 सामन्यांतील सलग तिसरा पराभव ठरला.

प्रारंभी, आरसीबीने 240 धावांचा डोंगर रचल्यानंतर हे तगडे आव्हान घेऊन मैदानात उतरलेला मुंबईचा संघ एकदाही विजयाच्या अगदी आसपासही दिसून आला नाही. अनुभवी रोहित शर्माला 19 धावांवर दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले तर तिलक वर्मा एका धावेवर बाद झाला. रियान रिकेल्टन (37), सूर्यकुमार यादव (33) यांनी उत्तम सुरुवात करूनही त्याचे मोठ्या खेळीत रूपांतर करता आले नाही. कर्णधार हार्दिक पंड्या 40 धावांवर बाद झाल्याने मुंबईला आणखी एक धक्का बसला. शेरफेन रुदरफोर्डने नाबाद 71 धावा केल्या. मात्र, अन्य फलंदाजांनी सपशेल निराशा केली. यामुळे, सातत्याने गडी बाद होत राहिल्याने मुंबईच्या धावसंख्येवर बर्‍याच मर्यादा राहिल्या.

आरसीबीच्या अर्धशतकवीरांची फटकेबाजी

प्रारंभी, सलामीवीर फिल सॉल्ट, विराट कोहली आणि कर्णधार रजत पाटीदार यांच्या तुफानी अर्धशतकांनंतर टीम डेव्हिडच्या फटकेबाजीमुळे आरसीबीने निर्धारित 20 षटकांत 4 बाद 240 धावांचा महाप्रचंड टप्पा गाठला होता. नाणेफेक जिंकून मुंबईने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, पण आरसीबीच्या सलामीवीरांनी त्यांचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. सॉल्ट आणि विराट जोडीने पहिल्या विकेटसाठी 120 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. सॉल्टने 36 चेंडूंत 6 चौकार, 6 षटकारांच्या मदतीने 78 धावांची वेगवान खेळी केली.

पाटीदारची ‘कॅप्टन इनिंग’

सलामीची जोडी फुटल्यानंतर रजत पाटीदारने अवघ्या 20 चेंडूंत 4 चौकार, 5 षटकारांसह 53 धावा कुटल्या. विराटने 38 चेंडूंत 50 धावांचे संयमी योगदान दिले. या दोघांनी 65 धावांची जलद भागीदारी करत संघाला द्विशतकाच्या समीप नेले. अखेरच्या षटकांमध्ये टीम डेव्हिडने 16 चेंडूंत 2 चौकार, 3 उत्तुंग षटकारांसह 34 धावांची नाबाद खेळी करत आरसीबीला 240 धावांपर्यंत पोहोचवले.

चार सामन्यानंतरही बुमराहची पाटी कोरीच!

या आयपीएल हंगामातील चारही सामने खेळणार्‍या स्पीडस्टार जसप्रीत बुमराहला अद्याप एकही विकेट घेता आलेली नाही. त्याने केकेआरविरुद्ध 0/35, दिल्लीविरुद्ध 0/21, राजस्थानविरुद्ध 0/32, आरसीबीविरुद्ध 0/35 असे पृथक्करण नोंदवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news