MI vs LSG | कर्णधार बदलला, नशीबही पालटले!

मुंबई इंडियन्सचा लखनौ सुपर जायंटस्विरुद्ध संस्मरणीय विजय
MI vs LSG | कर्णधार बदलला, नशीबही पालटले!
Kunal Patil
Published on
Updated on

मुंबई; वृत्तसंस्था : इम्पॅक्ट प्लेयर रोहित शर्मा (44 चेंडूंत 84) व रियान रिकेल्टनच्या (32 चेंडूंत 83) धुवाँधार अर्धशतकांच्या बळावर मुंबई इंडियन्सने आयपीएल साखळी सामन्यात लखनौ सुपर जायंटस्चा 6 गडी राखून धुव्वा उडवला. प्रारंभी, निकोलस पूरनच्या फटकेबाजीमुळे लखनौने 5 बाद 228 धावांचा डोंगर रचला होता. मात्र, प्रत्युत्तरात मुंबईनेही तोडीस तोड प्रत्युत्तर देत रोमांचक विजयावर शिक्कामोर्तब केले. नियमित कर्णधार हार्दिक पंड्या पाठदुखीमुळे खेळू शकला नाही. मात्र, त्याच्या गैरहजेरीतच मुंबईने या हंगामातील आतापर्यंतचा सर्वोत्तम विजय संपादन केला.

विजयासाठी 229 धावांचे आव्हान असताना रोहित शर्मा व रियान रिकेल्टन यांनी 10.5 षटकांतच 143 धावांची जोरदार सलामी देत विजयाचा भरभक्कम पाया रचला. 6 चौकार व 8 उत्तुंग षटकार खेचणारा रिकेल्टन बाद झाल्यानंतर रोहितने सर्व सूत्रे हाती घेत लखनौला आणखी जेरीस आणले. मधल्या फळीत तिलक वर्मा (11), सूर्यकुमार (12) स्वस्तात बाद झाले असले तरी नमन धीर (नाबाद 23) व विल जॅक्स (नाबाद 10) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

तत्पूर्वी, गुणतालिकेत तळात असलेल्या लखनौने निकोलस पूरनच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर 5 बाद 228 धावांचा हिमालय उभा केला. पूरनने अवघ्या 21 चेंडूंत 63 धावा कुटत या हंगामातील आपले पहिले अर्धशतक झळकावले. सलामीवीर मिचेल मार्शने 44 धावांचे योगदान देत पाया रचल्याने लखनौची सुरुवात आश्वासक झाली. पुढे निकोलस पूरनने चौकार-षटकारांची आतषबाजी करत लखनौची धावगती 10 च्या वर नेली. एडन मार्कराम (नाबाद 31) आणि हिम्मत सिंग (नाबाद 40) यांनी स्फोटक फलंदाजी करत संघाला सव्वादोनशे पार पोहोचवले.

हार्दिक पंड्या पाठदुखीमुळे बाहेर

नियमित कर्णधार हार्दिक पंड्या पाठदुखीमुळे बाहेर असल्याने सूर्यकुमार यादवने मुंबईचे नेतृत्व केले. 5 सामन्यांनंतर संघात परतत असलेल्या रोहित शर्माचा ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून समावेश करण्यात आला. तो खेळणार असल्याचे सूर्याने जाहीर करताच चाहत्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. नंतर रोहितनेही चाहत्यांचा विश्वास सार्थ ठरवत जोरदार फटकेबाजी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news