

Indias Kush Maini wins F2 Monaco Grand Prix 2025
मोनॅको : भारताच्या कुश मैनी याने प्रतिष्ठित F2 मोनॅको ग्रां प्री 2025 मधील स्प्रिंट रेस जिंकत इतिहास रचला आहे. या स्पर्धेत विजयी होणारा पहिला भारतीय चालक ठरण्याचा मान त्याला मिळाला आहे. DAMS Lucas Oil टीमसाठी खेळताना त्याने जबरदस्त कामगिरी केली. या विजयामुळे कुशने केवळ स्पर्धा नाही जिंकली, तर भारतीय मोटरस्पोर्टचा तिरंगा जागतिक स्तरावर फडकावला.
Alpine F1 टीमचा रिझर्व्ह ड्रायव्हर असलेल्या कुशने पॉलेवरून सुरुवात करत 30 फेऱ्यांची ही रेस आघाडीवर राहून पूर्ण केली. या ऐतिहासिक क्षणाने संपूर्ण भारताला अभिमान वाटतोय, आणि त्याच्या या यशावर आनंद महिंद्रा यांच्यासह संपूर्ण देशाने कौतुकाचा वर्षाव केला आहे.
"P1 आणि मोनॅकोमध्ये जिंकणारा पहिला भारतीय बनणं हे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. माझ्या टीमचं आणि सर्व समर्थकांचं आभार मानतो. आपण विश्वास ठेवत राहू!"अशा शब्दांत कुशने आपली भावना व्यक्त केली.
या विजयानंतर भारताचे राष्ट्रगीत मोनॅकोमध्ये वाजले आणि कुशने त्याचा अभिमानाने उद्घोष केला. हा क्षण संपूर्ण भारतासाठी अभिमानाचा ठरला.
महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी X (पूर्वीचं ट्विटर) वरून कुशचे अभिनंदन केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, "तू अभिमानाने उभा आहेस @kmainiofficial, आणि तुझ्यासोबत संपूर्ण देशही उभा आहे. कुश मैनीने मोनॅकोमध्ये F2 शर्यतीत विजय मिळवून इतिहास रचला आहे. @MahindraRacing टीममध्ये तू आमचा भाग आहेस, याचा आम्हाला अभिमान वाटतो."
या विजयाच्या क्षणी भारतीय उद्योजक गौतम सिंघानिया यांनी पिट लेनमध्ये कुशला मिठी मारत अभिनंदन केलं. JK रेसिंग आणि TVS रेसिंग या दोन्ही संस्थांनी त्याच्या कारकिर्दीत सातत्याने पाठिंबा दिला आहे.
2025 च्या हंगामाची सुरुवात कुशसाठी काहीशी कठीण होती, पण मोनॅकोतील या विजयाने त्याचा आत्मविश्वास आणि मनोबल दोन्ही उंचावले आहे. शनिवारीची स्प्रिंट रेस तो पोल पोझिशनवरून (P1) सुरू करत पूर्णपणे आघाडीवर राहिला. विशेष म्हणजे, रिव्हर्स ग्रिड प्रणालीमुळे त्याला ही संधी मिळाली होती कारण तो फीचर रेससाठी P10 ला पात्र ठरला होता.
आता कुशचे लक्ष्य रविवारची फीचर रेस आणि त्यानंतर येणाऱ्या बार्सिलोना ग्रां प्री कडे आहे. मोनॅकोतील हा ऐतिहासिक विजय त्याच्या पुढील कारकिर्दीसाठी प्रेरणादायी ठरेल.
कुशचा जन्म 22 सप्टेंबर 2000 रोजी बेंगळुरू, कर्नाटक येथे झाला. कुशने 2016 मध्ये इटालियन F4 चॅम्पियनशिपमध्ये सिंगल-सीटर रेसिंगमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने विविध चॅम्पियनशिप्समध्ये भाग घेतला.
2018: BRDC ब्रिटिश F3 – तिसेर स्थान पटकावले. तर 2020: BRDC ब्रिटिश F3 मध्ये दुसरे स्थानपटकावले होते. 2024: बुडापेस्ट स्प्रिंट रेसमध्ये पहिला F2 विजय त्याने मिळवला होता. कुशला दोन वेळचा F1 चॅम्पियन मिका हक्किनेन मार्गदर्शन करीत आहेत. कुशचा मोठा भाऊ अर्जुनदेखील एक रेसिंग चालक आहे.