

Kris Srikkanth apologizes to Rohit Sharma
मुंबई : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. टीम इंडियाने २८ वर्षांचा दुष्काळ संपवत चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला होता. घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकणारा धोनीचा संघ हा पहिलाच संघ ठरला. मात्र, हे यश मिळवताना निवड समितीला काही कठीण निर्णय घ्यावे लागले होते. असाच एक निर्णय रोहित शर्माबाबतचा होता. त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. आता यावरून भारतीय संघाचे माजी मुख्य निवडकर्ते कृष्णमाचारी श्रीकांत यांनी रोहित शर्माची माफी मागितली आहे.
रोहितला २०११ च्या वर्ल्ड कप संघातून बाहेर ठेवण्याचा निर्णय संघाच्या संतुलनावर आधारित होता. त्या वेळी कृष्णमाचारी श्रीकांत भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता होते. त्यांनी सांगितले की, मॅनेजमेंटने १९८३ च्या विजयाचाच 'ब्लूप्रिंट' फॉलो केला होता, ज्यामध्ये स्पेशालिस्ट खेळाडूंपेक्षा 'मल्टी डायमेंशनल स्किल' (ऑलराउंडर) असलेल्या खेळाडूंवर जास्त भर दिला गेला होता.
माजी मुख्य निवडकर्ता श्रीकांत यांना रोहितला वर्ल्ड कप संघातून बाहेर ठेवल्याबद्दल आजही खूप खंत वाटते. त्यांनी रोहितची माफीही मागितली आहे. 'द वीक'ला दिलेल्या मुलाखतीत श्रीकांत म्हणाले, "मला आजही त्याच्याबद्दल वाईट वाटते. मी गेल्या वर्षी रोहितला भेटलो तेव्हा म्हणालो होतो, 'मला माफ कर, मला माफ कर'. ते मुद्दाम केले नव्हते, फक्त आम्हाला संघात जास्तीत जास्त ऑलराउंडर्स हवे होते. आमचा विचार १९८३ च्या वर्ल्ड कपसारखाच होता."
श्रीकांत यांनी मान्य केले की, त्या निर्णयाचा आजही त्यांच्या मनावर परिणाम होतो. फलंदाजीची खोली वाढवणे आणि संघात गोलंदाजीचे जास्तीत जास्त पर्याय उपलब्ध असणे, ही त्यांची रणनीती होती. हीच रणनीती भारताच्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या विजयातही दिसून आली.
२०११ च्या स्पर्धेत भारतीय ऑलराउंडर्सनी मोठी भूमिका बजावली होती. युवराज सिंगने ९ सामन्यांत ३६२ धावा केल्या आणि १५ विकेट्स घेतल्या; तो 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' ठरला होता. संघातील अनेक प्रमुख फलंदाज जसे की सुरेश रैना, वीरेंद्र सहवाग, सचिन तेंडुलकर आणि युसूफ पठाण हे देखील प्रसंगी गोलंदाजी करू शकत होते. "शेवटी स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण ठरला? युवराज सिंग, ज्याने बॅट आणि बॉल दोन्हीने चमक दाखवली. काही सामन्यांत सहवाग, सचिन आणि रैना यांनीही षटके टाकली. युसूफ पठाण देखील एक ऑलराउंडर होता. पण दुर्दैवाने या 'ऑलराउंडर' संकल्पनेमुळे रोहित शर्माला संघात जागा मिळू शकली नाही. तो २०११ चा वर्ल्ड कप खेळण्यासाठी पूर्णपणे पात्र होता, पण या संधीला मुकला."
रोहित शर्माने कसोटी आणि टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० वर्ल्ड कप २०२४ आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ जिंकली आहे. सध्या तो फक्त वनडे क्रिकेटमध्ये सक्रिय आहे. रोहितने आतापर्यंत एकदाही वनडे वर्ल्ड कप जिंकलेला नाही. २०२३ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने फायनलपर्यंत मजल मारली होती, पण ऑस्ट्रेलियाने भारताचे जेतेपदाचे स्वप्न भंग केले. आता ३८ वर्षीय रोहितचे लक्ष २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपवर आहे. सध्या तो आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सचा भाग असून, दुखापतीमुळे गेल्या दोन सामन्यांत तो खेळू शकला नाही.