पुढारी ऑनलाईन डेस्क : कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs SRH IPL Final) ने रविवारी चेन्नईत खेळलेल्या आयपीएल २०२४ च्या फायनलमध्ये सनराईजर्स हैदराबादला पराभवाची धूळ चारत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. २०१२ व २०१४ मध्ये त्यांनी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली 'आयपीएल' विजेतेपद मिळवले होते. केकेआरच्या विजयानंतर चाहते गौतम गंभीरचे कौतुक करत असताना कर्णधार श्रेयस अय्यरचे मात्र मत वेगळे आहे.
गौतम गंभीर हा केकेआरचा मेंटॉर आहे. कर्णधार व मेंटॉर म्हणून 'आयपीएल' ट्रॉफी जिंकणारा गंभीर हा पहिलाच खेळाडू आहे. आयपीएलचे जेतेपद (KKR vs SRH IPL Final) पटकावल्यानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयसने संघाचे कौतुक केले आणि हैदराबादला शुभेच्छाही दिल्या. श्रेयस म्हणाला, आम्हाला खेळाडूंकडून अशाच कामगिरीची अपेक्षा होती. या भावनेचे वर्णन करणे माझ्यासाठी खूप कठीण आहे. आम्ही भाग्यवान होतो की आम्हाला प्रथम गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. सगळं काही आपल्या बाजूने चाललंय असं वाटत होतं. मी सनरायझर्सचे अभिनंदन करू इच्छितो ज्यांनी संपूर्ण स्पर्धेत चमकदार खेळ केला. कोणत्याही एका व्यक्तीमुळे आम्ही इथपर्यंत पोहचलो नाही तर तर संघाच्या सामूहिक प्रयत्नांमुळे आम्हाला यश मिळाले आहे, असे श्रेयसने म्हटले आहे.
'आयपीएल २०२४'च्या फायनलमध्ये 'केकेआर'ने उत्तम गोलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबादचा ८ विकेटस् आणि तब्बल ५७ चेडू राखून सहज पराभव केला. गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर वेंकटेश अय्यरने एकहाती सामना जिंकून दिला. चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय सनरायझर्सच्या अंगलट आला. स्टार्कने पहिल्याच षटकात अभिषेक शर्माचा त्रिफळा उडवला होता. केकेआरच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत सनरायझर्स हैदराबादला १८.३ षटकात ११३ धावांवर रोखले होते. केकेआरने १०.३ षटकातच २ बाद ११४ धावा करून सामना जिंकला.
हेही वाचा :