KKR vs RR IPL : ‌‘केकेआर‌’चा दुष्काळ संपुष्टात! यंदाच्या हंगामात मिळवला पहिला विजय, बलाढ्य राजस्थान रॉयल्सला पराभवाचा दणका

KKR च्या रिंकू सिंह-अनुकूलने कुटल्या 37 चेंडूंत 76 धावा
KKR vs RR IPL : ‌‘केकेआर‌’चा दुष्काळ संपुष्टात! यंदाच्या हंगामात मिळवला पहिला विजय, बलाढ्य राजस्थान रॉयल्सला पराभवाचा दणका
Published on
Updated on

कोलकाता : उपकर्णधार रिंकू सिंग (34 चेंडूंत नाबाद 53) व अनुकूल रॉय (16 चेंडूंत नाबाद 29) यांनी 37 चेंडूंत 76 धावांची अभेद्य भागीदारी साकारल्यानंतर अखेर ‌‘केकेआर‌’ने यंदाच्या ‌‘आयपीएल‌’ हंगामात बलाढ्य राजस्थान रॉयल्सला नमवत आपला पहिलावहिला विजय नोंदवला.

प्रारंभी राजस्थानला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 155 अशा माफक धावसंख्येवर रोखल्यानंतर ‌‘केकेआर‌’चीही 2 बाद 5 वरून 6 बाद 85 अशी दाणादाण उडाली. मात्र, रिंकू व अनुकूल यांनी त्यानंतर अजिबात यश मिळू न देता विजयावर सहज शिक्कामोर्तब करून दिले. कोलकाताचा 22 दिवसांचा विजयाचा दुष्काळ यानिमित्ताने संपुष्टात आला.

प्रारंभी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानला ‌‘केकेआर‌’च्या फिरकी जोडगोळीने जखडून ठेवले. वरुण चक्रवर्ती (3/14) आणि सुनील नारायण (2/26) यांच्या जादुई फिरकीसमोर राजस्थानला 9 बाद 155 धावांपर्यंतच मजल मारता आली. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने (46) आक्रमक सुरुवात केली खरी; पण चक्रवर्तीने त्याला बाद करत टी-20 क्रिकेटमधील आपला 200 वा बळी टिपला. कर्णधार रियान पराग (12) पुन्हा अपयशी ठरल्याने राजस्थानची मधली फळी पत्त्यासारखी कोसळली.

रिंकूचा क्लास

156 धावांचा पाठलाग करताना ‌‘केकेआर‌’ची सुरुवात अतिशय खराब झाली. जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर यांनी झटपट धक्के देत ‌‘केकेआर‌’ची अवस्था 2 बाद 5 अशी केली. कर्णधार अजिंक्य रहाणे सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. कॅमेरून ग्रीनने (27) डाव सावरण्याचा प्रयत्न केला; पण मधल्या षटकांत बिष्णोई आणि रवींद्र जडेजाच्या फिरकीने ‌‘केकेआर‌’ला 13.3 षटकांत 6 बाद 85 अशा संकटात ढकलले होते. त्यानंतर रिंकू व अनुकूल ही जोडी एकत्र आली आणि त्यानंतर ‌‘केकेआर‌’ला मागे वळून पाहावे लागले नाही.

बर्गरची चूक ‌‘केकेआर‌’च्या पथ्यावर

‌‘केकेआर‌’ला अखेरच्या 6 षटकांत 69 धावांची गरज असताना रिंकू सिंगचा झेल नांद्रे बर्गरने सोडून मोठी चूक केली. या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवत रिंकूने आक्रमक पवित्रा घेतला. त्याने रवी बिष्णोईला षटकार मारून सामन्याचे चित्र पालटले. अनुकूल रॉयनेही त्याला उत्तम साथ देत आर्चरच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला. या विजयामुळे ‌‘केकेआर‌’ने नववे स्थान गाठले आहे, तर राजस्थानला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान रॉयल्स : 20 षटकांत 9/155 (वैभव सूर्यवंशी 28 चेंडूंत 46, यशस्वी जैस्वाल 39. वरुण चक्रवर्ती, कार्तिक त्यागी प्रत्येकी 3 बळी. सुनील नारायण 2/26).

केकेआर : 19.4 षटकांत 6 बाद 161. (रिंकू सिंग 34 चेंडूंत 5 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 53, अनुकूल रॉय 16 चेंडूंत नाबाद 29, रवींद्र जडेजा 2/8).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news