

Khushi Mukherjee on Suryakumar Yadav
मुंबई : भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फैजान अन्सारी याने १३ जानेवारी रोजी अभिनेत्री खुशी मुखर्जी विरोधात १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. खुशी मुखर्जीने एका मुलाखतीदरम्यान "सूर्यकुमार मला खूप मेसेज करायचा," असा दावा केला होता.
मुंबईत राहणाऱ्या अन्सारीने गाझीपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, मुखर्जीचे दावे खोटे आणि बदनामीकारक असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यासाठी तो स्वतः मुंबईहून गाझीपूरला गेला होता.
अन्सारीच्या म्हणण्यानुसार, खुशी मुखर्जीने प्रसिद्धी मिळवण्यासाठी सूर्यकुमार यादवबद्दल जाणूनबुजून अशी विधाने केली आहेत, ज्यामुळे एका क्रिकेटपटूच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो. अन्सारीने अभिनेत्रीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली असून, या दाव्याप्रकरणी तिला किमान सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा व्हावी, असे म्हटले आहे.
कायदेशीर कारवाईबद्दल सांगताना अन्सारीने सांगितले की, "या प्रकरणात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. याआधी पूनम पांडेवरही १०० कोटींचा दावा केला होता. आमची कायदेशीर टीम खूप मजबूत आहे. जर खुशी तिचे आरोप सिद्ध करू शकली, तर तो आपली चूक जाहीरपणे मान्य करेल," असेही तो म्हणाला.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात 'क्रिकेटपटूंना डेट करण्याबाबत' विचारलेल्या प्रश्नावर खुशी म्हणाली होती, "मला कोणत्याही क्रिकेटपटूला डेट करायचे नाही. अनेक क्रिकेटपटू माझ्या मागे आहेत. सूर्यकुमार मला खूप मेसेज करायचा, पण आता आमचे बोलणे होत नाही. मला माझे नाव त्याच्याशी जोडलेले आवडणार नाही." मात्र, त्याच वेळी तिने स्पष्ट केले होते की, तिच्यात आणि सूर्यकुमारमध्ये कोणतेही नाते नव्हते.