

बंगळूर; वृत्तसंस्था : सलामीवीर अमन मोखाडे याचे झंझावाती शतक आणि रविकुमार समर्थ याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विदर्भाने विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत कर्नाटकचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह विदर्भाने दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली आहे.
प्रथम फलंदाजी करताना कर्नाटकने करुण नायर आणि कृष्णन श्रीजित यांच्या अर्धशतकांच्या जोरावर 49.4 षटकांत 280 धावा केल्या होत्या. विदर्भाच्या दर्शन नळकांडे याने 5 बळी घेत कर्नाटकला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्यात यश मिळवले.
त्यानंतर 281 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना विदर्भाची सुरुवात खराब झाली. अथर्व तायडे (6) लवकर बाद झाला. मात्र, त्यानंतर अमन मोखाडेने 122 चेंडूंत 12 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 138 धावांची मॅरेथॉन खेळी केली. अमन आणि ध्रुव शोरे (47) यांनी 98 धावांची भागीदारी करून डावाला आकार दिला. त्यानंतर अमन आणि रविकुमार समर्थ यांनी तिसर्या विकेटसाठी 147 धावांची निर्णायक भागीदारी केली. रविकुमारने 69 चेंडूंत 76 धावांची नाबाद खेळी करत विदर्भाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विदर्भाने हे लक्ष्य 46.2 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.