

Jos Buttler Rohit Sharma jersey : भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज रोहित शर्माने १९ जुलै रोजी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर धडाकेबाज शतकी खेळी साकारली होती. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने ११० चेंडूंत १७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने १३८ धावा ठोकल्या होत्या. लॉर्ड्सवर शतक झळकावणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. या सामन्यानंतर 'हिटमॅन' रोहितने इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरला एक खास भेटवस्तू दिली होती. रोहितने स्वाक्षरी (ऑटोग्राफ) केलेली आपली जर्सी बटलरला भेट दिली, ज्याचा फोटो बटलरने इंस्टाग्रामवरही शेअर केला होता. आता बटलरने ही जर्सी मिळवण्यासाठी त्याला कशी कसरत करावी लागली, याचा रंजक खुलासा केला आहे.
'फॉर द लव्ह ऑफ क्रिकेट' या यूट्यूब चॅनेलवर बोलताना ३५ वर्षीय बटलर म्हणाला, "सध्याच्या महान खेळाडूंपैकी फक्त रोहित शर्माचीच जर्सी माझ्याकडे नव्हती. मला त्याची जर्सी कोणत्याही परिस्थितीत हवी होती. पण रोहित हा क्रिकेट जगतातील एवढा मोठा दिग्गज आहे की त्याच्याशी बोलताना मी प्रचंड नर्व्हस झालो होतो. माझ्याकडून कोणतीही उद्धटपणाची वागणूक जाऊ नये, याची मी काळजी घेत होतो. खरं तर मालिकेच्या सुरुवातीला भारतीय संघाच्या व्यवस्थापकांनी रोहितसाठी माझी जर्सी मागितली होती. त्यामुळे मी त्याला जर्सी देण्यासाठी भारतीय ड्रेसिंग रूममध्ये गेलो होतो."
"मी विचार करत होतो की रोहित आसपास असेल तर त्याची जर्सी मागून घ्यावी, कारण भविष्यात मी त्याच्याविरुद्ध पुन्हा खेळेन की नाही याची खात्री नव्हती. पण तो तिथे नव्हता. तो येईल या आशेने मी आसपास थांबून इतरांशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो,"असेही बटलर म्हणाला.
"नंतर मला समजले की रोहित मैदानात मुलाखत देत आहे. मी तिथेच थांबलो. जेव्हा मी लॉंग रूममध्ये आलो, तेव्हा रोहित तिथे एका महत्त्वाच्या फोनवर बोलत होता. पण तरीही धीर धरून मी त्याला जर्सी मागू शकतो का, असं विचारलं. रोहितने क्षणाचाही विलंब न लावता लगेच 'सॉरी' म्हटलं, फोन बाजूला ठेवला आणि माझी विनंती मान्य केली. तो लगेच वर गेला आणि एका सुंदर संदेशासह (ऑटोग्राफ) त्याने मला त्याची जर्सी भेट दिली."
रोहितची जर्सी मागण्याची प्रेरणा कशी मिळाली, हे सांगताना बटलर म्हणाला, "इंग्लंडचा क्रिकेटपटू लिअम डॉसनशी बोलल्यानंतर मी रोहितकडे जाण्याचा निर्णय घेतला. मी सहसा जास्त जर्सी बदलणारा खेळाडू नाही, पण काही खेळाडूंची जर्सी मला मनापासून हवी होती. काही वर्षांपूर्वी टॉसच्या वेळीही मी रोहितला जर्सी मागितली होती. तेव्हा त्याने सामन्यानंतर बघूया असं म्हटलं होतं, पण आमची जर्सी अदलाबदल झाली नाही. यावेळी लॉर्ड्सवर डॉसन हा जसप्रीत बुमराहशी बोलत होता. मी त्याला विचारलं की तू बुमराहची शर्ट घेणार आहेस का? तो म्हणाला, 'हो नक्कीच, तो जसप्रीत बुमराह आहे!' तेव्हा मला वाटलं की रोहितकडे पुन्हा जर्सी मागण्याची हीच योग्य वेळ आहे." असेही बटलरने सांगितले. विशेष म्हणजे, बटलर इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. २०१६ आणि २०१७ च्या मोसमात तो मुंबई इंडियन्सचा भाग होता. सध्या बटलर गुजरात टायटन्स संघाकडून खेळत आहे.