Rohit-Virat Big Record : रोहित-विराट जोडीचा ऐतिहासिक पराक्रम; ४०० आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळणारी पहिली भारतीय जोडी

IND vs ENG 3rd ODI : सचिन-द्रविडचा विक्रम निघाला मोडीत
Rohit Sharma Virat Kohli Record
Published on
Updated on

लंडन : भारतीय क्रिकेट विश्वातील दोन दिग्गज फलंदाज, कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली या जोडीने रविवारी (१९ जुलै) लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरताच एका नव्या इतिहासाला गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकत्र ४०० सामने खेळण्याचा टप्पा पार करणारी ही पहिलीच भारतीय जोडी ठरली आहे. भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने एकत्र खेळण्याचा विक्रम या जोडीच्या नावावर आधीपासूनच नोंदवला गेला आहे.

यापूर्वी हा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या नावावर होता, ज्यांनी एकत्र ३९१ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. आता रोहित-विराट जोडीने त्यांना मागे टाकत अव्वल स्थान अधिक मजबूत केले आहे.

जागतिक क्रिकेटचा विचार केला तर, एकत्र सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम श्रीलंकेच्या कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांच्या नावावर आहे. या दिग्गज जोडीने ५५० सामन्यांमध्ये एकत्र सहभाग घेतला होता. त्यांच्यापाठोपाठ श्रीलंकेचेच तिलकरत्ने दिलशान आणि महेला जयवर्धने यांची जोडी ४२६ सामन्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

या जागतिक यादीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची जोडी आता ४०० सामन्यांसह सातव्या क्रमांकावर पोहोचली आहे. भारतीय क्रिकेटच्या या दोन्ही आधुनिक महानायकांनी जवळपास एकाच कालखंडात आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.

रोहित-विराट जोडीची देदीप्यमान कारकीर्द

रोहित शर्माने २००७ मध्ये आणि विराट कोहलीने २००८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ हे दोन्ही खेळाडू भारतीय फलंदाजीचे मुख्य आधारस्तंभ राहिले आहेत. या दोन्ही दिग्गजांनी टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असून, सध्या ते केवळ एकदिवसीय (ODI) स्वरूपातच भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट कोहली आणि रोहित शर्मा अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. विराट कोहलीच्या नावावर १४,८६७ धावा तर रोहित शर्माच्या नावावर ११,७५७ धावांची नोंद आहे. या बलाढ्य जोडीने भारतीय संघाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले असून, त्यांच्या उपस्थितीत भारताने दोन आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि एक टी-२० विश्वचषक जिंकण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने एकत्र खेळणाऱ्या अव्वल जोड्या

  • कुमार संगकारा-महेला जयवर्धने (श्रीलंका) : ५५० सामने

  • तिलकरत्ने दिलशान-महेला जयवर्धने (श्रीलंका) : ४२६ सामने

  • कुमार संगकारा-तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका) : ४१८ सामने

  • सनथ जयसूर्या-मुथैया मुरलीधरन (श्रीलंका) : ४०८ सामने

  • जॅक कॅलिस-मार्क बाउचर (दक्षिण आफ्रिका) : ४०७ सामने

  • रोहित शर्मा-विराट कोहली (भारत) : ४०० सामने

  • सचिन तेंडुलकर-राहुल द्रविड (भारत) : ३९१ सामने

  • सनथ जयसूर्या-चमिंडा वास (श्रीलंका) ३९१ सामने

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news