IND vs ENG : विश्वविक्रमासाठी जो रूटचा रडीचा डाव, 'लॉर्डस्'च्या मैदानावर काय घडलं?
IND vs ENG Joe Root Karun Nair catch controversy
नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील वाद थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. एकीकडे ड्यूक बॉलवरून वाद सुरू असतानाच, आता एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. लॉर्ड्सवर जो रूटने करुण नायरचा झेल पकडून विश्वविक्रम केला, मात्र आता याच झेलवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. इंग्लंडने पहिल्या डावात ३८७ धावा केल्या. यानंतर, भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ३ गडी बाद १४५ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी करुण नायरने खेळपट्टीवर टिकून राहण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो आपला डाव लांबवू शकला नाही.
रूटच्या झेलवरून वाद
करुण नायर इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. त्याने डावाच्या सुरुवातीला खूप संयम दाखवला. मात्र, बेन स्टोक्सच्या एका चेंडूवर त्याची गफलत झाली. भारताच्या डावातील २१ वे षटक बेन स्टोक्स टाकत होता. या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर नायरच्या बॅटची कड घेऊन चेंडू स्लिपच्या दिशेने गेला, जिथे उभ्या असलेल्या जो रूटने डाईव्ह मारून झेल घेतला.
'बेईमानी' केल्याचा आरोप
यानंतर रिव्ह्यूमध्ये पाहिल्यानंतर असे वाटत होते की चेंडू जमिनीला स्पर्श करत आहे. मात्र, तिसऱ्या पंचांनी (थर्ड अंपायर) हा झेल वैध ठरवला. त्यांच्या मते, जेव्हा चेंडू जमिनीला लागला, तेव्हा रूटची बोटे चेंडूखाली होती. याच कारणामुळे करुण नायरच्या डावाचा अंत झाला. नायरने ६२ चेंडूत ४० धावा केल्या.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
आता सोशल मीडियावर रूटच्या या झेलचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे, ज्यामध्ये चाहत्यांनी पंचांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, जो रूटवर 'बेईमानी' केल्याचा आरोपही लावला आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी हा झेल चुकीचा असल्याचे म्हटले आहे. रूटने खरं सांगून खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवायला हवे होते, असेही चाहत्यांनी म्हटले आहे.
रूटने रचला विश्वविक्रम
विशेष म्हणजे, जो रूट कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक झेल घेणारा (यष्टीरक्षक वगळून) क्षेत्ररक्षक ठरला आहे. त्याने राहुल द्रविडचा विश्वविक्रम मोडून नवा इतिहास रचला. रूटच्या नावावर आता कसोटीत २११ झेल झाले आहेत. द्रविडने कसोटीत २१० झेल घेतले होते.

