

लंडन; वृत्तसंस्था : इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या कसोटीच्या दुसर्या दिवशी ‘लॉर्डस्’च्या मैदानावर भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीने अक्षरशः आग ओकली. त्याने 74 धावांत 5 बळी घेत आपली भेदकता आणखी एकदा अधोरेखित केली. मात्र, जो रूटचे कारकिर्दीतील 37 वे शतक आणि तळाच्या क्रमवारीत कार्सच्या लक्षवेधी अर्धशतकामुळे इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 387 धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर भारताने दुसर्या दिवसअखेर 3 बाद 145 धावांपर्यंत मजल मारली.
इंग्लंडचा डाव सर्वबाद 387 धावांवर गुंडाळल्यानंतर भारताची सुरुवात मात्र खराब झाली होती. सलामीवीर यशस्वी जैस्वाल अवघ्या 13 धावांवर आर्चरचा बळी ठरला. दुसर्या स्लीपमधील ब्रूकने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर के. एल. राहुलने करुण नायरसह दुसर्या गड्यासाठी 61 धावा जोडल्या. स्टोक्सने नायरला रूटकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. या मालिकेत उत्तम बहरात असलेल्या कर्णधार शुभमन गिलचे स्वस्तात बाद होणे मात्र धक्कादायक ठरले. गिलने अवघ्या 16 धावांवर वोक्सच्या गोलंदाजीवर यष्टीमागे स्मिथकडे झेल देत तंबूत परतला. पुढे, के. एल. राहुल व ऋषभ पंत यांनी आणखी पडझड न होऊ देता चौथ्या गड्यासाठी 38 धावा जोडल्या. दुसर्या दिवसाचा खेळ संपला, त्यावेळी के. एल. राहुल 53, तर ऋषभ पंत 19 धावांवर खेळत होते.
दिवसाची सुरुवात इंग्लंडचा कर्णधार जो रूटच्या 37 व्या कसोटी शतकाने झाली असली, तरी त्यानंतर जे घडले ते इंग्लिश संघासाठी एखाद्या वादळापेक्षा कमी नव्हते. पहिल्या दिवशी फक्त एक विकेट घेणार्या बुमराहने प्रारंभिक सत्रातील पहिल्या 30 मिनिटांतच बेन स्टोक्स, जो रूट आणि ख्रिस वोक्स यांसारख्या महत्त्वाच्या फलंदाजांना माघारी धाडत इंग्लंडच्या डावाला सुरुंग लावला.
पहिल्या दिवशी 5 बाद 251 धावांवरून इंग्लंडने दुसर्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र, नंतर त्यांना यात 136 धावांची भर घालता आली. डावाच्या 86 व्या षटकात बुमराहने एका अप्रतिम चेंडूवर स्टोक्सला चकवले. गूड लेंथवर पडलेला हा चेंडू स्टोक्सचा फॉरवर्ड डिफेन्स भेदून थेट ऑफ स्टम्प उद्ध्वस्त करून गेला. आपल्या पुढच्याच षटकात डावाच्या 87 व्या षटकात बुमराहने सर्वात मोठे सावज टिपताना जो रूटला बाद केले. बुमराहने थोडासा पुढे टाकलेला चेंडू रूटला पुढे येऊन खेळण्यास भाग पाडले. चेंडूने रूटच्या बॅटची आतली कड घेतली आणि थेट मधला स्टम्प उखडून टाकला. पुढच्याच चेंडूवर ख्रिस वोक्सदेखील पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. बुमराहने पुन्हा एकदा चेंडू पुढे टाकला आणि त्याला अतिरिक्त उसळी मिळाली. चेंडू वोक्सच्या बॅटला हलकासा स्पर्श करून गेला. ज्युरेलला खात्री नव्हती; पण भारताने ‘डीआरएस’ घेतल्यानंतर कारण अल्ट्राएजमध्ये चेंडू बॅटला लागल्याचे स्पष्ट दिसले.
बुमराहची हॅट्ट्रिक थोडक्यात हुकली; पण त्याने इंग्लंडच्या फलंदाजीला मोठे खिंडार पाडले होते. भारतीय संघातर्फे बुमराहशिवाय, सिराज व नितीशकुमार रेड्डी यांनी प्रत्येकी 2 बळी घेत भेदक मारा साकारला, तर जडेजानेही 1 बळी घेतला.