Asian Games 2026 | गोंधळाच्या सावटात आशियाई स्पर्धेला प्रारंभ

४५ देशांचे ११ हजारहून अधिक खेळाडू कौशल्‍य पणाला लावणार
Asian Games 2026 |
Asian Games 2026 | गोंधळाच्या सावटात आशियाई स्पर्धेला प्रारंभArun Sharma
Published on
Updated on

नागोया; वृत्तसंस्था : तयारीतील ढिसाळ कारभार आणि व्यवस्थापनातील त्रुटींमुळे निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर, जपानने शनिवारी आशियाई क्रीडा स्पर्धेचा संयमित उद्‌घाटन सोहळा सादर केला. अत्याधुनिक तंत्रज्ञान, औद्योगिक क्षमता आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचा अप्रतिम मेळ घालत जपानने या महासोहळ्याची दिमाखात नांदी केली. येत्या १५ दिवसांत ४५ देशांचे सुमारे ११ हजार खेळाडू ४३ क्रीडाप्रकारांतील ७१ स्पर्धांमध्ये ४६९ सुवर्णपदकांसाठी आपले कसब पणाला लावणार आहेत.

४ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या क्रीडामहोत्सवातील बास्केटबॉल, फुटबॉल आणि क्रिकेटच्या प्राथमिक फेरीतील लढतींना आधीच सुरुवात झाली आहे. ‘हार्मोनिक हार्ट बीट’ या संकल्पनेवर आधारलेल्या या सोहळ्याच्या माध्यमातून टोकियो (१९५८) आणि हिरोशिमा (१९९४) नंतर जपानने तिसऱ्यांदा आशियाई क्रीडा जगताचे यजमानपद भूषवले आहे.

‘वन एशिया’ (अखंड आशिया) हा एकात्मतेचा संदेश देण्यासाठी मुख्य व्यासपीठ खास हृदयाच्या आकारात साकारण्यात आले होते. दोन तास चाललेल्या या सोहळ्यात जपानचे सम्राट नारुहितो यांनी २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या प्रारंभाची अधिकृत घोषणा केली. टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये नावारूपाला आलेले ‘ॲक्सेसिबल पीपल मूव्हर’ (एपीएम) हे विशेष पर्यावरणपूरक वाहन या सादरीकरणात आकर्षणाचा भाग ठरले.

आयोजन समितीवर जोरदार टीका

दरम्यान, स्पर्धेच्या पूर्वसंध्येपर्यंत खेळाडूंच्या राहण्याची अपुरी व्यवस्था, नियोजनातील गोंधळ आणि वाहतुकीचा बोजवारा यामुळे स्थानिक आयोजन समितीसह ‘ओसीए’ला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले. या स्‍पर्धेसाठी जपानने क्रीडाग्राम उभारण्‍याऐवजी खेळाडूंच्‍या निवासाची व्‍यवस्‍था जवळपासचे हॉटेल्‍स व तात्‍पुरत्‍या स्वरूपाच्या छावण्यांमध्ये केली आहे. तसेच इटलीमधून एक क्रूझही मागवण्यात आले आहे. बहुतांशी खेळाडूंच्या निवासाची सोय या क्रूझमध्ये करण्यात आली आहे. मात्र, यापासून सरावाचे व स्पर्धेचे ठिकाण दूर अंतरावर असल्याने खेळाडू याबाबत नाराज आहेत.

महाकाय रोबोटिक हात ठरला विशेष लक्षवेधी

३० हजार प्रेक्षकांनी भरलेल्या मिझुहो पार्क ॲथलेटिक स्टेडियममध्ये स्थानिक ऐची प्रांताची औद्योगिक प्रगती आणि पारंपरिक कला यांचा विलोभनीय संगम पाहायला मिळाला. यामध्ये जपानच्या पारंपरिक ‘काबुकी’ नाट्यसंस्कृतीसोबतच हातात ध्वज फडकवणारा महाकाय औद्योगिक रोबोटिक हात विशेष लक्षवेधी ठरला.

मनू भाकर, पवन सेहरावतकडे भारताचे नेतृत्व

खेळाडूंच्या दिमाखदार संचलनात भारताचे नेतृत्व स्टार नेमबाज मनू भाकर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केले. नेव्ही ब्ल्यू साडी आणि ब्लेझर परिधान केलेल्या मनू भाकरने हसतमुखाने हात उंचावून उपस्थितांचे अभिवादन स्वीकारले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news