

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये नामिबियाविरुद्ध खेळताना भारतीय सलामीवीर इशान किशनने आपल्या बॅटने अक्षरशः वादळ निर्माण केले. २४ चेंडूत ६१ धावांची स्फोटक खेळी करत इशानने केवळ भारताला भक्कम सुरुवातच करून दिली नाही, तर तीन मोठे विक्रमही आपल्या नावावर केले. इशानने अवघ्या २० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण करत दिग्गज फलंदाजांच्या मांदियाळीत स्थान मिळवले आहे.
इशानच्या या खेळीत ६ चौकार आणि ५ गगनभेदी षटकारांचा समावेश होता. या धडाकेबाज कामगिरीमुळे त्याने टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील अनेक जुन्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
टी-२० विश्वचषकात भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतक
इशान किशनने २० चेंडूत अर्धशतक झळकावून युवराज सिंहच्या २००७ मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या यादीत युवराज सिंह अजूनही १२ चेंडूंतील अर्धशतकासह अव्वल स्थानी आहे.
१२ चेंडू: युवराज सिंह विरुद्ध इंग्लंड (२००७)
१८ चेंडू: केएल राहुल विरुद्ध स्कॉटलंड (२०२१)
१९ चेंडू: रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०२४)
२० चेंडू: युवराज सिंह विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२००७)
२० चेंडू: इशान किशन विरुद्ध नामिबिया (२०२६)
टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्या ६ षटकांच्या आत अर्धशतक पूर्ण करण्याचा पराक्रम करणारा इशान हा केवळ तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
५१ (२१ चेंडू):* रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०२४)
५० (१९ चेंडू): केएल राहुल विरुद्ध स्कॉटलंड (२०२१)
५० (२० चेंडू): इशान किशन विरुद्ध नामिबिया (२०२६)
पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या भारतीयांच्या यादीत इशानने रोहित शर्माची बरोबरी केली आहे.
अभिषेक शर्मा: ३ वेळा
रोहित शर्मा: २ वेळा
इशान किशन: २ वेळा
केएल राहुल / यशस्वी जयस्वाल: १ वेळा
संजू सॅमसनच्या २२ (८ चेंडू) आणि इशान किशनच्या ६१ धावांच्या जोरावर भारताने पॉवरप्लेच्या ६ षटकांत १ बाद ८६ धावा कुटल्या. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील पॉवरप्लेमधील ही चौथी सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. या यादीत वेस्ट इंडिज (९२ धावा, २०२४) पहिल्या स्थानावर आहे.
इशानच्या या कामगिरीमुळे भारतीय संघाने नामिबियावर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण केला असून, आगामी सामन्यांसाठी इशानचा हा फॉर्म प्रतिस्पर्धी संघांसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे.