

Ishan Kishan historic performance duleep trophy final east zone champion
चेन्नई : गेल्या तब्बल १३ वर्षांपासून ज्या क्षणाची आतुरतेने प्रतीक्षा होती, तो ऐतिहासिक पराक्रम अखेर कर्णधार ईशान किशनने करून दाखवला आहे. दुलीप करंडकाच्या (Duleep Trophy) अंतिम फेरीत साऊथ झोनवर वर्चस्व गाजवत ईस्ट झोनच्या संघाने अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. हा अंतिम सामना अनिर्णित राहिला असला, तरी पहिल्या डावातील भक्कम आघाडीच्या जोरावर ईस्ट झोनला अधिकृतपणे विजेता घोषित करण्यात आले.
या ऐतिहासिक विजयात कर्णधार ईशान किशनचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले. त्याने केवळ बॅटनेच धावांचा डोंगर रचला नाही, तर मैदानावर कर्णधार म्हणून मोक्याच्या क्षणी घेतलेले रणनीतिक निर्णय ईस्ट झोनसाठी विजेतेपद मिळवून देणारे ठरले.
ईस्ट झोनने साऊथ झोनचे आव्हान मोडीत काढत प्रतिष्ठेचा दुलीप करंडक उंचावला. यापूर्वी २०२५ मध्ये ईशान किशनच्याच नेतृत्वाखाली झारखंड संघाने 'सय्यद मुश्ताक अली करंडक' जिंकून नवा इतिहास रचला होता; झारखंडचे ते पहिलेच जेतेपद होते. त्यानंतर आता ईस्ट झोनच्या १३ वर्षांच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यातही ईशानने मोलाची भूमिका बजावली आहे.
विशेष म्हणजे, सय्यद मुश्ताक अली स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘सामनावीर’चा पुरस्कार पटकावणाऱ्या ईशानने, पूर्णपणे वेगळ्या फॉरमॅट खेळल्या गेलेल्या दुलीप करंडकाच्या अंतिम सामन्यातही पुन्हा एकदा 'सामनावीर'चा किताब पटकावण्याचा अनोखा पराक्रम केला.
ईशान किशनची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील कर्णधारपदाची कारकीर्द विशेष उल्लेखनीय ठरली आहे. आतापर्यंत खेळलेल्या १६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने नेतृत्व केले असून, त्यापैकी ८ सामन्यांत संघाला विजय मिळवून दिला आहे, तर उर्वरित ८ सामने अनिर्णित राहिले आहेत. म्हणजेच, त्याच्या कर्णधारपदाखाली संघाला अद्याप एकाही सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागलेले नाही.
ही कामगिरी प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासातील एक विलक्षण योगायोग मानली जात आहे. दुसरीकडे, साऊथ झोनचा कर्णधार तिलक वर्मा याने अंतिम लढतीत ९९ धावांची झुंजार खेळी साकारली खरी; मात्र ईस्ट झोनच्या आव्हानापुढे त्याची ही एकाकी झुंज अपुरी पडली.
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ईस्ट झोनने फलंदाजांच्या दर्जेदार कामगिरीच्या जोरावर पहिल्या डावात ७०८ धावांचा महाकाय डोंगर उभा केला. यामध्ये कर्णधार ईशान किशनच्या झंझावाती २७० धावांचा सिंहाचा वाटा राहिला. या धावसंख्येचा पाठलाग करताना साऊथ झोनचा संपूर्ण संघ पहिल्या डावात अवघ्या ३३६ धावांवर गारद झाला.
ईस्ट झोनकडे साऊथ झोनला फॉलोऑन देऊन पुन्हा फलंदाजीस पाचारण करण्याची उत्तम संधी होती; परंतु कर्णधार ईशानने सुरक्षित रणनीती आखत स्वतः पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ईस्ट झोनने दुसऱ्या डावात ७ बाद ३८८ धावा उभारल्यानंतर हा सामना अनिर्णित म्हणून घोषित करण्यात आला आणि पहिल्या डावातील भक्कम आघाडीच्या निकषावर ईस्ट झोनने अधिकृतपणे विजेतेपदाचा करंडक आपल्या नावावर केला.