

csk head coach stephen fleming says csk got it wrong at the IPL auction
चेन्नई : इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये घरच्या मैदानावर आणखी एक पराभव पत्करावा लागला. सनरायझर्स हैदराबादने ‘करो वा मरो’ लढतीत बाजी मारून सीएसकेचे प्ले ऑफचे स्वप्न जवळपास संपुष्टात आणले आहे.
चेन्नईच्या या निराशाजनक कामगिरीनतंर मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये आम्ही हवे ते खेळाडू मिळवू शकलो नाही आणि त्याचाच फटका बसल्याचे कबूल केले. त्यांनी संघाच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारली आणि खेळाडूंना अधिक चांगले प्रदर्शन करण्यास सांगितले. इतर संघांनी चांगली प्रगती केली आहे आणि लिलावात त्यांनी चांगले खेळाडू करारबद्ध केले, पण आम्ही योग्य रीतीने गोष्टी जमवू शकलो नाही,’ असे तो म्हणाला.
संघाची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नाही, यासाठी दुखापती, फॉर्मचा अभाव आणि खेळाची योजना निश्चित न होणे ही कारणे आहेत, असेही फ्लेमिंगने सांगितले. आम्हाला आत्मपरीक्षण करावे लागेल, काही महत्त्वाच्या दुखापती, फॉर्मचा थोडासा अभाव. आम्हाला खेळाची योजना निश्चित करण्यात आणि सातत्य राखण्यात अडचण आली, असे फ्लेमिंग म्हणाले.
आम्हाला मिळणार्या पाठिंब्याची जाणीव आहे आणि ती फक्त चेन्नईतच नाही, तर संपूर्ण भारतात आहे. आम्हाला महेंद्रसिंग धोनीच्या प्रभावामुळे मिळणार्या समर्थनाची जाणीव आहे, पण जेव्हा पिवळ्या रंगाची ती गर्दी पाहतो, तेव्हा आम्हाला एक जबाबदारी जाणवते. या पाठिंब्याला चांगल्या कामगिरीने प्रतिसाद न देणे ही बाब पचवणे आम्हाला खूप जड जाते, हेही फ्लेमिंगने मान्य केले.