IPL 2027 Trade : हार्दिक पंड्या ‘पंजाब’कडून खेळणार, अर्शदीपची ‘MI’मध्ये एन्ट्री? IPL 2027 पूर्वी 'मेगा ट्रेड'ची दाट शक्यता

IPL 2027 Trade : हार्दिक पंड्या ‘पंजाब’कडून खेळणार, अर्शदीपची ‘MI’मध्ये एन्ट्री? IPL 2027 पूर्वी 'मेगा ट्रेड'ची दाट शक्यता
Published on: 
Updated on: 

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२७ (IPL 2027) च्या लिलावापूर्वी क्रिकेट वर्तुळात मोठ्या घडामोडींना वेग आला असून, मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात एका मेगा ट्रेड होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. या संभाव्य करारानुसार अष्टपैलू हार्दिक पंड्या पंजाब किंग्जमध्ये जाण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे समजते आहे.

मुख्य प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग यांच्या मार्गदर्शनाखालील पंजाब किंग्जचे मुंबई इंडियन्ससोबतची चर्चा सकारात्मक दिशेने पुढे गेल्याचे बोलले जात आहे. या देवाणघेवाणीत भारताचा प्रमुख डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि यष्टिरक्षक फलंदाज विष्णू विनोद हे मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात दाखल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

'स्पोर्टस्टार'च्या वृत्तानुसार, उभय फ्रँचायझींचे वरिष्ठ व्यवस्थापन या प्रस्तावित देवाणघेवाणीवर जवळपास सहमत झाले असून, लवकरच आयपीएलच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत अधिकृत कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली जाईल. १७ नोव्हेंबर या खेळाडू कायम राखण्याच्या (रिटेंशन) अंतिम मुदतीपूर्वी म्हणजेच चालू आठवड्याच्या अखेरपर्यंत या कराराची अधिकृत घोषणा होऊ शकते. सामना फिरवण्याची क्षमता असणाऱ्या हार्दिक पंड्यासारख्या अव्वल अष्टपैलू खेळाडूसाठी पंजाब किंग्ज आपल्या प्रमुख वेगवान गोलंदाजाला सोडण्यास तयार असल्याचे समजते.

मुंबई इंडियन्सच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हार्दिक-अर्शदीप यांच्यातील या ट्रेड करारासाठी प्राथमिक पुढाकार घेतला होता. पंजाब किंग्जने हार्दिकला आपल्या संघात समाविष्ट करण्याबाबत सकारात्मकता दाखवल्यानंतर, बदल्यात अर्शदीप सिंग आणि विष्णू विनोद यांना मुंबईकडे सोपवण्यावर चर्चेचा रोख केंद्रित झाला.

दरम्यान, मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्यासाठी किमान अन्य तीन संघांशीही संपर्क साधला होता. पंजाबव्यतिरिक्त केवळ कोलकाता नाईट रायडर्स (KKR) सोबतच मुंबईची चर्चा अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचली होती, ज्यामध्ये एकापेक्षा अधिक खेळाडूंच्या अदलाबदलीचा प्रस्ताव विचाराधीन होता. आता हार्दिक पंजाब किंग्जमध्ये जाण्याची शक्यता प्रबळ झाल्याने, मुंबई इंडियन्सच्या अन्य एखाद्या बड्या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी केकेआर प्रयत्न करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अर्शदीप सिंग संघातून बाहेर पडण्याच्या शक्यतेमुळे पंजाब किंग्ज आणखी एका कराराच्या तयारीत आहे. संघ व्यवस्थापन लखनौ सुपर जायंट्सशी (LSG) संपर्क साधून डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खान आणि ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉइनिस यांच्यात थेट अदलाबदलीचा प्रस्ताव ठेवू शकते. संघात हार्दिक पंड्याचे आगमन झाल्यास स्टॉइनिसची भूमिका मर्यादित राहण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे पंजाबचे व्यवस्थापन मोहसीन खानला गोलंदाजीतील महत्त्वाचा दुवा मानते.

यापूर्वी २०२५ च्या महालिलावाआधी पंजाब किंग्जने अर्शदीप सिंगला संघमुक्त केले होते; मात्र लिलावादरम्यान 'राईट टू मॅच' (RTM) कार्डचा वापर करत त्याला पुन्हा संघात कायम राखले होते. सनरायझर्स हैदराबादने त्याच्यावर १५.७५ कोटी रुपयांवरून थेट १८ कोटी रुपयांची बोली लावली होती, पंजाबने तितकीच रक्कम मोजून या डावखुऱ्या गोलंदाजाला आपल्याकडे राखले होते.

दुसरीकडे, हार्दिक पंड्या आयपीएल २०२४ पूर्वी गुजरात टायटन्सकडून पूर्णपणे रोख रकमेच्या करारावर मुंबई इंडियन्समध्ये परतला होता. त्याआधी दोन मोसम तो गुजरात टायटन्सचा कर्णधार होता आणि २०२२ मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली संघाने विजेतेपदही पटकावले होते. मात्र, मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारल्यानंतर त्याचे मागील तिन्ही मोसम फारसे प्रभावी ठरले नाहीत आणि या काळात संघ दोन वेळा गुणतालिकेत तळाच्या स्थानावर फेकला गेला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.