IPL 2026 RCB : चिन्नास्वामी स्टेडियममधील ११ जागा कायमस्वरूपी राहणार रिक्त; RCB चा ऐतिहासिक आणि भावूक निर्णय

Chinnaswamy Stadium emotional tribute : सराव सत्रात खेळाडू परिधान करणार '११' क्रमांकाची जर्सी
IPL 2026 RCB : चिन्नास्वामी स्टेडियममधील ११ जागा कायमस्वरूपी राहणार रिक्त; RCB चा ऐतिहासिक आणि भावूक निर्णय
Published on
Updated on

बेंगळुरू : आयपीएल २०२६ चा हंगाम सुरू होण्यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) फ्रँचायझीने एक अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील निर्णय घेतला आहे. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममधील ११ जागा यापुढे प्रत्येक सामन्यादरम्यान रिक्त ठेवल्या जाणार आहेत. गेल्या वर्षी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.

आयपीएलच्या १९ व्या हंगामापूर्वी आरसीबीने घेतलेला हा निर्णय क्रीडा जगतात चर्चेचा विषय ठरला आहे. ४ जून २०२५ रोजी आरसीबीने आपले पहिले आयपीएल जेतेपद पटकावले होते. या विजयाचा जल्लोष साजरा करत असताना चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला होता. या मृतांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि त्यांच्या सन्मानार्थ फ्रँचायझीने हा मोठा निर्णय घेतला आहे.

मैदानातील 'त्या' ११ जागांवर आता कोणीही बसणार नाही

४ जून रोजी स्टेडियमबाहेर उसळलेल्या अलोट गर्दीमुळे एक भीषण दुर्घटना घडली होती, ज्याने क्रिकेट विश्व हादरले होते. आता आरसीबी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) यांनी संयुक्तपणे घेतलेल्या निर्णयानुसार, स्टेडियममधील एका मुख्य स्टँडमधील ११ जागा प्रेक्षकांसाठी हटवण्यात आल्या आहेत. आयपीएल असो वा आंतरराष्ट्रीय सामने, या जागा आता कायमस्वरूपी रिक्त राहतील. आरसीबीच्या या उदात्त निर्णयाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर उभारले जाणार स्मारक

मृतांना आदरांजली वाहण्यासाठी आरसीबीने केवळ जागा रिक्त ठेवण्यापुरतेच मर्यादित न राहता, स्टेडियमच्या आवारात एक भव्य स्मारक उभारण्याचाही निर्णय घेतला आहे. २८ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या आयपीएलच्या उद्घाटन सामन्यापूर्वी या स्मारकाचे अनावरण केले जाईल. तसेच, सामन्याच्या दिवशी या ११ मृतांची नावे मोठ्या स्क्रीनवर प्रदर्शित केली जातील आणि त्यांच्या स्मृतीस एक मिनिटाचे मौन पाळून अभिवादन करण्यात येईल.

सराव सत्रात खेळाडू परिधान करणार '११' क्रमांकाची जर्सी

या हंगामात आरसीबीचे खेळाडू सराव सत्रादरम्यान ११ क्रमांकाची जर्सी परिधान करून या पीडितांना श्रद्धांजली अर्पण करतील. फ्रँचायझीचे सीईओ राजेश मेनन यांनी या नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी कर्नाटक सरकार, पोलीस आणि प्रशासनाचे आभार मानत सांगितले की, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आता कठोर 'SOP' (Standard Operating Procedure) लागू करण्यात आली आहे.

सलामीची लढत: RCB विरुद्ध SRH

आयपीएल २०२६ चा भव्य उद्घाटन सोहळा २८ मार्च रोजी बेंगळुरूमध्ये पार पडणार आहे. हंगामातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाईल. विशेष म्हणजे, आरसीबीचा संघ रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल, तर सनरायझर्स हैदराबादची धुरा ईशान किशनकडे असेल. हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी अनुपलब्ध असल्याने किशनकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news