

ipl 2026 retantion csk birthday wishes to sanju samson on social media
संजू सॅमसन सध्या खूपच चर्चेत आहे. ११ नोव्हेंबर रोजी त्याने वयाची ३१ वर्षे पूर्ण केली. त्याआधीच त्याच्याबाबतच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. आयपीएल २०२६ साठी खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची (रिटेन्शन) प्रक्रिया जवळ आली असून, प्रत्येक संघाने कोणत्या खेळाडूंना कायम ठेवले आहे आणि कोणाला सोडले आहे, हे जाहीर करण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत.
याच पार्श्वभूमीवर, संजू सॅमसन आता त्याचा मूळचा आयपीएल संघ राजस्थान रॉयल्स सोडून सीएसकेमध्ये जाणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. तथापि, याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अशा परिस्थितीत, संजू जर चेन्नई सुपरकिंग्समध्ये गेला, तर त्याला किती रक्कम मिळेल, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
आयपीएल २०२६ चा हंगाम भलेही मार्चमध्ये सुरू होणार असला, तरी त्यासाठीची तयारी आत्तापासूनच सुरू झाली आहे. प्रत्येक संघ कोणत्या खेळाडूंना कायम ठेवायचे आहे आणि कुणाला मुक्त करायचे आहे, अशांची यादी तयार करण्यात व्यस्त आहेत. त्याचबरोबर, संजू सॅमसनचा ‘ट्रेड’ होणार असल्याचीही चर्चा आहे.
संजू राजस्थान रॉयल्स सोडून सीएसकेत जाणार आणि त्या बदल्यात सीएसकेचा संघ राजस्थान रॉयल्सला रवींद्र जडेजा आणि सॅम करनला देणार असल्याची शक्यता आहे. एक ते दोन दिवसांत यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे.
या संपूर्ण अदलाबदलीमध्ये तीन खेळाडू आणि दोन संघांचा समावेश आहे. सर्व संबंधित फ्रँचायझींचे यावर एकमत झाले असून, बीसीसीआयची (BCCI) औपचारिक परवानगी घेऊन याची घोषणा केली जाईल, अशी माहिती समोर येत आहे. याचदरम्यान संजू सॅमसनचा वाढदिवसही ११ नोव्हेंबर रोजी साजरा होत असून धोनीच्या सीएसकेने सोशल मीडियावर एक पोस्ट करून सॅमसनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. असे यापूर्वी असे क्वचितच पाहायला मिळाले होते, त्यामुळे सध्या सुरू असलेल्या बातम्या खऱ्या असून, लवकरच याबाबत उघडपणे घोषणा केली जाईल, असा कयास बांधला जात आहे.
मागील वर्षीच्या आयपीएलसाठी राजस्थान रॉयल्सने संजू सॅमसनला १८ कोटींची रक्कम खर्च करून रिटेन केले होते. राजस्थानने इतकीच रक्कम यशस्वी जैस्वालसाठीही देण्यात आली होती. म्हणजेच, जर संजू सीएसकेमध्ये गेला, तर त्याला तिथेही १८ कोटी रुपयेच दिले जातील. याचा अर्थ, त्याच्या वेतनात कोणतीही कपात होणार नाही. मात्र, राजस्थान रॉयल्समध्ये येणारे रवींद्र जडेजा आणि सॅम करन यांना तिथे आल्यावर किती रक्कम दिली जाते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
आयपीएल खेळणाऱ्या सर्व १० संघांना १५ नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत बीसीसीआयला कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवत आहे आणि कोणाला सोडत आहे, हे कळवावे लागणार आहे. या प्रक्रियेला जास्त वेळ शिल्लक नाही, त्यामुळे सर्व आयपीएल संघ सध्या खूप व्यस्त असून, आपल्या खेळाडूंची अंतिम यादी तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत.