

IPL 2026 च्या रणधुमाळीपूर्वी गुजरात टायटन्सच्या (GT) गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संघाचा युवा आणि आक्रमक फलंदाज साई सुदर्शन विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळताना दुखापतग्रस्त झाला असून त्याला उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे.
विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ अंतर्गत तामिळनाडू विरुद्ध मध्य प्रदेश (२६ डिसेंबर) या सामन्यादरम्यान सुदर्शनला ही दुखापत झाली. ५१ धावांच्या खेळीदरम्यान धावबाद होण्यापासून वाचण्यासाठी त्याने मारलेल्या 'डाईव्ह'मुळे त्याच्या उजव्या बरगडीला मार लागला. सीटी स्कॅनमध्ये त्याच्या उजव्या बाजूच्या सातव्या बरगडीला 'फ्रॅक्चर' झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या दुखापतीमुळे सुदर्शनने कर्नाटक (२९ डिसेंबर) आणि झारखंड (३१ डिसेंबर) विरुद्धच्या सामन्यांत सहभाग घेतला नाही. सध्या तो बेंगळुरू येथील बीसीसीआयच्या (BCCI) सेंटर ऑफ एक्सीलेंस (CoE) मध्ये वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे.
साई सुदर्शनचे पुनर्वसन सुरू झाले असून सध्या तो लोअर-बॉडी फिटनेस आणि कंडिशनिंगवर लक्ष केंद्रित करत आहे. बरगडीची दुखापत पूर्णपणे बरी व्हावी, यासाठी सध्या शरीराच्या वरच्या भागाचा कोणताही व्यायाम टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. येत्या ७ ते १० दिवसांत वेदना कमी झाल्यानंतर तो स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरू करण्याची शक्यता आहे.
जरी सुदर्शन विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीच्या आगामी काही सामन्यांना मुकणार असला, तरी गुजरात टायटन्ससाठी एक समाधानाची बाब समोर आली आहे. हे फ्रॅक्चर गंभीर नसून हाडे आपल्या जागेवरून हललेली नाहीत, त्यामुळे शस्त्रक्रियेची गरज भासणार नाही. वैद्यकीय अंदाजानुसार, IPL 2026 सुरू होण्यापूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊन मैदानात पुनरागमन करेल आणि २०२६ च्या हंगामात खेळण्यासाठी उपलब्ध राहण्याची शक्यता आहे.