Cricket Records : 2026 मध्ये किंग कोहलीच्या निशाण्यावर 3 ऐतिहासिक ‘विराट’ विक्रम; ‘हा’ पराक्रम करताच ठरणार जगातील पहिला फलंदाज

२०२५ मध्ये विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपला जुना दरारा दाखवत अनेक विक्रम मोडले. आता २०२६ मध्येही त्याच्याकडे तीन मोठ्या संधी आहेत.
Cricket Records : 2026 मध्ये किंग कोहलीच्या निशाण्यावर 3 ऐतिहासिक ‘विराट’ विक्रम; ‘हा’ पराक्रम करताच ठरणार जगातील पहिला फलंदाज
Published on
Updated on

भारतीय क्रिकेट संघाचा सुपरस्टार विराट कोहलीने २०२५ या वर्षाचा शेवट अत्यंत धडाकेबाज कामगिरीने केला आहे. आता २०२६ या नवीन वर्षात त्याच्यासमोर तीन मोठे विक्रम प्रस्थापित करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

भारतीय संघाचे सद्यस्थितीत पूर्ण लक्ष २०२६ च्या सुरुवातीला होणाऱ्या टी-२० विश्वचषकावर आहे. त्यानंतर संघ २०२७ च्या एकदिवसीय (ODI) विश्वचषकाच्या तयारीला लागेल. या वर्षात टीम इंडियाला अनेक द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळायच्या आहेत, ज्यामध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा विराट कोहली आणि रोहित शर्मावर असतील. २०२५ मध्ये विराटने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपला जुना दरारा दाखवत अनेक विक्रम मोडले. आता २०२६ मध्ये त्याच्याकडे दोन आंतरराष्ट्रीय आणि एक आयपीएलमधील अशा तीन मोठ्या यशाची प्रतीक्षा आहे.

१. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५,००० धावांचा टप्पा: केवळ ४४३ धावा दूर

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत केवळ सचिन तेंडुलकरलाच १५,००० धावांचा टप्पा ओलांडता आला आहे. सचिनने ४५२ सामन्यांत १८,४२६ धावा केल्या आहेत. आता कोहली हा टप्पा गाठणारा जगातील दुसरा फलंदाज बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्याने आतापर्यंत २९६ डावांत १४,५५७ धावा केल्या आहेत. २०२६ मधील सामन्यांचे वेळापत्रक पाहता, कोहलीसाठी उर्वरित ४४३ धावा करणे फारसे कठीण जाणार नाही.

२. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या यादीत दुसऱ्या स्थानी झेप

टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराटचे पूर्ण लक्ष आता एकदिवसीय फॉरमॅटवर आहे. २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (सर्व फॉरमॅट मिळून) सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचू शकतो. यासाठी त्याला श्रीलंकेच्या कुमार संगकाराला मागे टाकावे लागेल. विराटने आतापर्यंत २७,६७५ धावा केल्या असून, संगकाराचा विक्रम मोडण्यासाठी त्याला केवळ ४२ धावांची गरज आहे. ११ जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या मालिकेतच तो हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

३. आयपीएलमध्ये ९,००० धावांचा टप्पा गाठणारा पहिला खेळाडू

आंतरराष्ट्रीय क्रिकेट व्यतिरिक्त, जगातील सर्वात मोठ्या टी-२० लीगमध्ये म्हणजेच आयपीएलमध्येही विराट इतिहास घडवू शकतो. आयपीएलच्या आगामी १९ व्या हंगामात विराटकडे ९,००० धावा पूर्ण करण्याची संधी आहे. सध्या तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी असून, ९,००० धावांचा आकडा गाठण्यासाठी त्याला ३३९ धावांची आवश्यकता आहे. असा पराक्रम करणारा तो आयपीएल इतिहासातील पहिला फलंदाज ठरेल. विराटने २५९ डावांत ८,६६१ धावा केल्या आहेत.

४. सौरव गांगुलीला मागे टाकण्याची नामी संधी

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात मैदानात उतरताच विराट कोहली भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याच्या बाबतीत माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकेल. सध्या या दोन्ही दिग्गज खेळाडूंनी प्रत्येकी ३०८ सामने खेळले आहेत. भारतासाठी सर्वाधिक ४६३ एकदिवसीय सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये शतकी धमाका

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत ३०२ धावा करत 'प्लेअर ऑफ द सीरिज' ठरलेल्या विराटने आपला फॉर्म विजय हजारे ट्रॉफीमध्येही कायम राखला आहे. त्याने आंध्र प्रदेशविरुद्ध १३१ धावांची आणि गुजरातविरुद्ध ७७ धावांची शानदार खेळी केली. न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी तो विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत आणखी एक सामना खेळण्याची शक्यता आहे.

एकदिवसीय शतकांचा बादशहा

२००८ मध्ये पदार्पण केल्यापासून विराट कोहली भारतीय संघाचा कणा राहिला आहे. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५३ शतके आणि ७६ अर्धशतकांचा विक्रम आहे. आगामी वर्षात हे आकडे आणखी वाढतील, यात शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news