

Bengaluru weather
बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आज (दि.३ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यात सामना होणार आहे. या हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमने-सामने येतील. गेल्या दोन दिवसांपासून बंगळुरूमध्ये सतत पाऊस पडत आहे. आजही येथे पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आरसीबी संघ १० सामन्यांत सात विजय आणि तीन पराभवांसह १४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. तर यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतूनही बाहेर पडला आहे. सीएसकेने १० पैकी तब्बल आठ सामने गमावले आहेत. चार गुणांसह चेन्नई संघ तळात दहाव्या स्थानावर आहे. या सामन्याबद्दल चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. धोनी आणि कोहली पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. आजच्या सामन्यात चेन्नईचा पराभव झाला तरी ही संघासाठी मोठी नामुष्की ठरणार आहे. कारण या संघाने आजवर एका हंगामात कधीही त्यांच्या एका प्रतिस्पर्ध्यांकडून दोन्ही लीग सामने गमावलेले नाहीत.
चाहत्यांमध्ये आजच्या सामन्यासाठी उत्सुक असतानाच हवामान अंदाजाने चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून बेंगळुरूमध्ये सतत पाऊस पडत आहे. आजही पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवारी बेंगळुरूमध्ये ७० टक्के पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. शनिवारी सायंकाळी बेंगळुरूमध्ये वादळासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय रात्री ८ ते १० दरम्यान पावसाचा अंदाज आहे. दिलासादायक बाब म्हणजे चिन्नास्वामी स्टेडियमची ड्रेनेज व्यवस्था चांगली आहे आणि जर सामन्यापूर्वी पाऊस पडला तर मैदान लवकरात लवकर खेळ सुरू करण्यासाठी तयार होऊ शकते.
आरसीबी १० सामन्यांमध्ये १४ गुणांसह पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र नेट रन-रेटमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सच्या मागे आहे. कोहली आतापर्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी करत आहे.यंदाच्या आयपीएल हंगामात ४४७ धावांसह तो सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांच्या यादीत आहे. विराट कोहली आयपीएलमध्ये एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम करू शकतो. सध्या हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. वॉर्नरने आयपीएलमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध २६ सामन्यात ११३४ धावा केल्या आहेत. हा एखाद्या संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. आता कोहली वॉर्नरचा हा विक्रम मोडू शकतो. कोहलीला वॉर्नरला मागे टाकण्यासाठी फक्त ५१ धावांची आवश्यकता आहे. आयपीएलमध्ये एकाच संघाविरुद्ध दोनदा ११०० पेक्षा जास्त धावा करण्याचा पराक्रम करणारा विराट कोहली हा एकमेव फलंदाज आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज विरुद्ध हा पराक्रम केला आहे. आता कोहली चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ११०० धावांचा टप्पा गाठणार आहे. हा टप्पा गाठण्यासाठी त्यांना फक्त १६ धावांची आवश्यकता आहे.