Operation Sindoor impact, IPL 2025 |
दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ चा हंगाम २५ मे पर्यंत चालणार आहे, तो नियोजित वेळापत्रकानुसार नियमितपणे सुरू राहील, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सांगितले.
२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर यशस्वीरित्या राबवले. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीचा आयपीएलच्या वेळापत्रकावर आणि सामन्यांवर कोणताही परिणाम होणार नाही आणि ते वेळापत्रकानुसारच होईल, असे सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.
आयपीएलच्या इतिहासात अनेकवेळा सामने स्थगित किंवा स्थळ बदलांना सामोरे जावे लागले आहे. मात्र ही स्पर्धा कधीही पूर्णपणे रद्द करण्यात आलेली नाही. २००९ मध्ये पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत लीगचे आयोजन करण्यात आले होते, कारण २००९ च्या लोकसभा निवडणुकीमुळे बहुतेक सुरक्षा व्यवस्था व्यस्त होती. त्यानंतर, २०१४ च्या हंगामात, १६ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत स्पर्धेचा पहिला भाग लोकसभा निवडणुकांमुळेच यूएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. परंतु २ मे नंतरचे आयपीएल सामने पुन्हा भारतात खेळवले गेले. २०२० मध्ये कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली नंतर यूएईमध्ये सामने झाले. त्यानंतर २०२१ मध्ये भारतातील कोविड-१९ साथीच्या परिस्थितीमुळे काही सामने वगळता यूएईमध्ये स्पर्धा झाली. २०२३ पासून आयपीएल पुन्हा एकदा संपूर्ण भारतात घेण्यात आली.