Who is IAF Wing Commander Vyomika Singh? |
दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारतीय हवाई दलाने बुधवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर रात्रीच्या वेळेस लक्ष्यभेदी हवाई कारवाई केली. या कारवाईत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबूल या दहशतवादी संघटनांचे अड्डे उध्वस्त केले. या कारवाईबाबत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, ज्यात लष्कराच्या कर्नल सोफिया कुरैशी आणि हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी संयुक्तपणे माहिती दिली. जाणून घ्या विंग कमांडर व्योमिका सिंग कोण आहेत? आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास...
विंग कमांडर व्योमिका सिंग या भारतीय हवाई दलातील एक सन्मानित हेलिकॉप्टर वैमानिक आहेत. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने केलेल्या लक्ष्यभेदी कारवाईनंतर आयोजित पत्रकार परिषदेचे त्यांनी नेतृत्व केले. 'ऑपरेशन सिंदूर' बाबतच्या या पत्रकार परिषदेमध्ये व्योमिका सिंग यांच्यासोबत लष्कराच्या कर्नल सोफिया कुरैशी यांनीही सहभाग घेतला होता. हवाई दल, लष्कर आणि नौदलाच्या अधिकाऱ्यांसोबत व्योमिका सिंग यांनी या कारवाईची सविस्तर माहिती पत्रकारांना दिली. इतक्या मोठ्या पातळीवर संयुक्त पत्रकार परिषदेत सहभागी होणाऱ्या त्या मोजक्या महिला अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.
‘ऑपरेशन सिंदूर’मधील महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या महिला विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी बालपणीच भारतीय हवाई दलात शौर्यवान अधिकारी होण्याचं स्वप्न पाहिलं होत. सहावीत असताना व्योमिका यांनी हवाई दलात जाण्याचं स्वप्न निश्चित केलं. त्यांच्या नावाचा अर्थ ‘व्योमिका’ म्हणजे आकाशाशी संबंधित; हाच त्यांच्या प्रेरणेचा केंद्रबिंदू ठरला. व्योमिका म्हणजे आकाशात राहणारी किंवा आकाशाची मुलगी असा होतो.
एनसीसी (NCC) सह त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या कुटुंबातील सशस्त्र दलात भरती होणाऱ्या पहिल्या सदस्य झाल्या. १८ डिसेंबर २०१९ रोजी त्यांना हेलिकॉप्टर पायलट म्हणून भारतीय हवाई दलाच्या फ्लाइंग ब्रँचमध्ये कायमस्वरूपी नियुक्ती मिळाली. त्यांनी आतापर्यंत २,५०० तासांहून अधिक उड्डाण अनुभव घेतला आहे. त्यांनी चेतक आणि चिता या हेलिकॉप्टरद्वारे जम्मू-काश्मीरच्या उंच पर्वतीय भागांपासून ते ईशान्य भारतातील दुर्गम क्षेत्रांमध्ये महत्त्वाची उड्डाणे पार पाडली आहेत. २०२० मध्ये, अरुणाचल प्रदेशातील एका महत्त्वाच्या बचाव मोहिमेत त्यांनी नागरिकांचे प्राण वाचवले होते, तर २०२१ मध्ये, त्यांनी एक सर्व महिलांचा समावेश असलेल्या त्रिसेना माउंट मणिरंग (२१,६५० फूट) चढाई मोहिमेत भाग घेऊन आपल्या नेतृत्वाचे दर्शन घडवले होते. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर झालेल्या तिन्ही दलांच्या पत्रकार परिषदेमध्ये व्योमिका यांनी नेतृत्व करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधले.
विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' राबवलं. नऊ दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करण्यात आले आणि यशस्वीरित्या नष्ट करण्यात आल्या. नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान टाळण्यासाठी आणि कोणत्याही नागरिकांचा जीवितहानी टाळण्यासाठी ही ठिकाणे निवडण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले.