

ipl 2025 revised schedule 18 days 17 matches 2 double headers see details
नवी दिल्ली : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्या लढतीने इंडियन प्रीमियर लीग 2025 आजपासून पुन्हा सुरू होत आहे. भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीमुळे लीग आठवड्यासाठी स्थगित केली गेली होती; पण शनिवारी बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर लीग पुन्हा नव्या दमाने खेळण्यासाठी सज्ज झाली आहे; पण आता प्ले ऑफच्या गणितांचीही जुळवाजुळव सुरू झाली आहे. सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे तीन संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झाले आहेत. परंतु, 4 जागांसाठी 7 संघ अजूनही शर्यतीत आहेत.
चेन्नई सुपर किंग्जने 12 पैकी 3, राजस्थान रॉयल्सने 12 पैकी 3, तर सनरायझर्स हैदराबादने 11 पैकी 3 सामने जिंकल्याने ते प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद झाले आहेत; पण या संघांच्या निकालांवर इतरांचे गणित अवलंबून आहे. ‘सीएसके’ला उर्वरित सामन्यांत राजस्थान (20 मे) व गुजरात टायटन्स (25 मे) यांच्याशी सामना करायचा आहे. गुजरातने हा सामना गमावल्यास त्यांना फटका बसू शकतो.
राजस्थानला पंजाब किंग्ज (18 मे) व चेन्नई सुपर किंग्ज (20 मे) यांच्याविरुद्ध खेळायचे आहेत आणि पंजाब किंग्जच्या सामन्यावर सर्वांचे लक्ष असणार आहे. तसेच ‘आरसीबी’ला उर्वरित सामन्यांत लखनौ सुपर जायंटस् (19 मे), रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (23 मे) व कोलकाता नाईट रायडर्स (25 मे) यांच्याविरुद्ध खेळायचे आहे. हे तिन्ही संघ प्ले ऑफच्या शर्यतीत आहेत आणि यांचा पराभव झाल्यास तिघांचे गणित बिघडू शकते.
सध्या गुणतालिकेवर लक्ष टाकल्यास गुजरात टायटन्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू हे संघ प्रत्येकी 11 सामने खेळून 16 गुणांसह अव्वल दोन क्रमांकावर आहेत. या दोघांना उर्वरित तीन सामन्यांत किमान एक विजय पुरेसा आहे. परंतु, अव्वल स्थानावर राहण्यासाठी त्यांना दोन किंवा तीन सामने जिंकावे लागतील. पंजाब किंग्जचा एक सामना पावसामुळे रद्द झाला आणि त्यांचे 11 सामन्यांत 15 गुण झाले. त्यांना उर्वरित सामन्यांत 2 विजय मिळवणे गरजेचे आहे. कारण, मुंबई इंडियन्सकडून त्यांना धोका आहे.
मुंबई इंडियन्स 12 सामन्यांत 14 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहेत आणि त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागतील. एक सामना जिंकूनही ते 16 गुणांसह शर्यतीत राहू शकतील; पण दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांना धोका आहे. दिल्ली कॅपिटल्स 11 सामन्यांत 13 गुणांसह पाचव्या क्रमांकावर आहे. त्यांनी तीन सामने जिंकल्यास 19 गुणांसह ते पुढे जाऊ शकतात. कोलकाता नाईट रायडर्स 11 गुण व लखनौ 10 गुणांसह शर्यतीत आहेत; पण त्यासाठी त्यांना उर्वरित सामने जिंकावे लागतील. ‘केकेआर’ दोन सामने जिंकून 15 गुणांपर्यंतच जाऊ शकतो आणि त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागेल. ‘एलएसजी’ तीन सामने जिंकून 16 गुणांपर्यंत पोहोचतील आणि नेट रनरेट निर्णायक ठरेल.