

IPL 2025 Qualifier 1 weather report
पंजाब किंग्स (PBKS) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) यांच्यातील IPL 2025 चा क्वालिफायर-1 सामना गुरुवारी (दि. 29) न्यू चंदीगड येथील मुल्लांपूर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा सामना आयपीएलच्या अंतिम फेरीसाठी महत्त्वाचा आहे, कारण यातील विजेता थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. परंतु, जर हा सामना पावसामुळे रद्द झाला, तर काय होईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आयपीएलचा नियम काय सांगतो याबद्दल जाणून घेऊया.
आयपीएलच्या नियमांनुसार, जर क्वालिफायर-1 सामना पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे पूर्णपणे रद्द झाला आणि कोणताही निकाल लागू शकला नाही, तर लीग स्टेजमध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानी असणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. याचा अर्थ, जर PBKS vs RCB सामना रद्द झाला तर पंजाब किंग्स अंतिम फेरीत प्रवेश करेल. कारण या संघाने लीग स्टेजमध्ये प्रथम स्थान मिळवले आहे.
PBKS आणि RCB दोन्ही संघांनी लीग टप्प्यात 14 सामन्यांतून प्रत्येकी 19 गुण मिळवले. परंतु, PBKS चा नेट रन रेट (+0.372) हा RCB च्या नेट रन रेट (+0.301)पेक्षा चांगला आहे, त्यामुळे PBKS गुणतक्त्यात प्रथम क्रमांकावर आहे.
जर सामना रद्द झाला तर RCB ला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्यांना क्वालिफायर-2 मध्ये खेळावे लागेल, जिथे ते एलिमिनेटरचा विजेता (मुंबई इंडियन्स किंवा गुजरात टायटन्स) यांच्याशी भिडतील.
आयपीएल 2025 मध्ये क्वालिफायर-1 आणि फायनलसाठी राखीव दिवस (Reserve Day) नाही. मात्र, सामना पूर्ण करण्यासाठी दोन तासांचा अतिरिक्त वेळ उपलब्ध करून दिला जाणार आहे. जर या वेळेतही सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर वरील नियम लागू होईल, अशी चर्चा आहे.
AccuWeather नुसार, मुल्लांपूर येथे गुरुवारी पावसाची शक्यता कमी आहे. सामन्याच्या वेळी तापमान 35 डिग्री पासून 28 डिग्रीपर्यंत राहील. आर्द्रता 38 टक्के ते 51 टक्के दरम्यान असेल. आकाश स्वच्छ राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे सामना रद्द होण्याची शक्यता कमी आहे. तरीही, जर पाऊस पडला आणि सामना खेळणे शक्य झाले नाही, तर पंजाब किंग्स थेट 3 जून रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या फायनलसाठी पात्र ठरेल.
पंजाब किंग्स : PBKS ने यंदाच्या हंगामात शानदार कामगिरी केली आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली आणि रिकी पॉटिंगच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लीग टप्प्यात 19 गुणांसह पहिले स्थान मिळवले. त्यांनी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या शेवटच्या लीग सामन्यात विजय मिळवून अव्वल स्थान पक्के केले.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू : RCB ने देखील उत्कृष्ट खेळ दाखवला, विशेषत: त्यांनी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध 228 धावांचा यशस्वी पाठलाग करत दुसरे स्थान मिळवले. जितेश शर्माच्या 33 चेंडूत नाबाद 85 धावांच्या खेळीने त्यांना क्वालिफायर-1 मध्ये स्थान मिळवून दिले