IPL 2025 Punjab Kings vs Mumbai Indians Shreyas Iyer angry on Shashank Singh |
अहमदाबाद : आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर लढतीत पंजाब किंग्जने सर्वस्व पणाला लावले आणि मुंबईच्या हातातोंडातील विजयाचा घास हिसकावून घेतला. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर, पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. या शानदार विजयासह पंजाबने ११ वर्षांनी आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक दिली. मात्र सामना संपल्यानंतर एक वेगळाच क्षण सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये श्रेयस अय्यर मैदानावरच त्याच्याच संघातील शशांक सिंगवर भडकला.
या सामन्यात शशांक सिंग एका अत्यंत महत्त्वाच्या क्षणी निष्काळजीपणे धावबाद झाला. त्यावेळी श्रेयस अय्यरही क्रीजवर होता, त्याला शशांकचे असे बाद होणे अतिशय बेजबाबदार वाटले. सामना एका महत्त्वाच्या टप्प्यावर असल्याने त्यावेळी श्रेयस अय्यरने आपला राग आवरला आणि सर्व लक्ष फलंदाजीवर केंद्रित केले, परंतु सामना संपताच त्याने मैदानावरच शशांक सिंगवर संतापला. श्रेयस अय्यर हा अतिशय थंड स्वभावाचा कर्णधार म्हणून ओळखला जातो, पण शशांकच्या चुकीमुळे त्याचा राग अनावर झाला होता.
विजयानंतर श्रेयस अय्यर मैदानावर मुंबई इंडियन्सचे खेळाडू आणि त्याच्या संघातील खेळाडूंशी हस्तांदोलन करत होता. शशांक सिंगला वाटले की अय्यर त्याची चूक माफ करेल, परंतु कर्णधार खूप रागावला. शशांक त्याच्या समोर येताच त्याने त्याच्याशी हस्तांदोलन केले नाही, उलट रागाने काहीतरी बोलला. श्रेयस अय्यरच्या हावभावांवरून असे वाटत होते की, तो शशांकला 'माझ्या समोर येऊ नकोस,' असे म्हणत असेल. काही वापरकर्त्यांनी अय्यरने शशांकला शिवी दिली असेल, असा दावा करत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या स्पर्धेतील पहिल्या क्वालिफायर लढतीत आरसीबीविरुद्ध पंजाबचा संघ अवघ्या १०१ धावांमध्ये खुर्दा झाला, त्यावेळी श्रेयस अय्यरच्या शॉट सिलेक्शनवर बरीच टीका झाली होती. त्यात दुसऱ्या क्वालिफायर लढतीत २०४ धावांचे तगडे आव्हान असल्याने आणि सलामीवीर स्वस्तात परतल्याने श्रेयसवर पुन्हा भिस्त होती. यावेळी मात्र श्रेयसने अजिबात निराशा केली नाही आणि त्याने संघाची नौका विजयापार नेली! आयपीएलमध्ये दोन वेगवेगळ्या फ्रँचायझींना फायनलमध्ये नेण्याचा पराक्रमही त्याने येथे गाजवला. पहिल्या क्वालिफायरमधील निराश श्रेयस आणि आता स्वतः धडाडीने लढत विजय अक्षरशः खेचून आणणारा श्रेयस, अशा दोन निरनिराळ्या व्यक्तिरेखा यावेळी प्रकर्षाने अधोरेखित झाल्या.