

राॅयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरबीसी) संघाने गुरुवारी (दि. ३० मे) आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाला ८ गडी आणि ६० चेंडू राखून धूळ चारत चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. टीम इंडियातील वन-डे फाॅर्मेटसह आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सध्या इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) अंतिम सामन्याच्या तयारीत व्यस्त आहे. दरम्यान, कर्नाटक पोलिसांनी विराट काेहलीच्या बंगळूरमधील वन 8 कम्यून पब-रेस्टॉरंटविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विराटचा बंगळूरमधील पब कायदेशीर अडचणीत सापडण्याची ही दुसरी वेळ आहे. जून २०२४ मध्ये सरकारच्या निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ पब सुरु ठेवल्याने कारवाई झाली होती.
कर्नाटक पोलिसांनी बंगळुरूमधील क्रिकेटपटू विराट कोहलीच्या वन८ कम्यून पबविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा पब बेंगळुरूमधील रत्नम कॉम्प्लेक्सच्या सहाव्या मजल्यावर आहे. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्याचे (सीओटीपीए) उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे.
रेस्टॉरंटमध्ये धूम्रपान करण्यासाठी कोणतेही वेगळे क्षेत्र नाही. यामुळे पबविरुद्ध सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने कायद्याच्या (सीओटीपीए) कायद्याच्या कलम ४ आणि २१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कलमांनुसार हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि विमानतळांसारख्या काही ठिकाणी धूम्रपानासाठी निश्चित क्षेत्रे उपलब्ध करणे अनिवार्य आहे. पब वन८ कम्यून पबमध्ये धूम्रपान क्षेत्राबाबत आवश्यक नियमांचे पालन केले जात नसल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. बेंगळुरूच्या क्यूबन पार्क पोलिसांनी रेस्टॉरंटविरुद्ध स्वतःहून खटला दाखल केला आहे.
वन८ कम्यून कायदेशीर अडचणीत सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी जूनमध्ये, पब आणि रेस्टॉरंटवर निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ सूरु ठेवल्याने खटला दाखल करण्यात आला होता. तर डिसेंबरमध्ये बंगळूर महापालिकेने (BBMP) अग्निशमन विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र न घेतल्याबद्दल वन८ कम्यून पब-रेस्टॉरंटला नोटीस बजावली होती.