

हांगझोऊ (चीन) : वृत्तसंस्था
येथे सुरू झालेल्या अशिया चषक महिला हॉकी स्पर्धेत शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघाने धडाकेबाज सुरुवात करताना थायलंडचा तब्बल 11-0 अशा मोठ्या फरकाने धुव्वा उडवून विजयी सलामी दिली. या सामन्यात उदिता दुहन आणि ब्युटी डुंगडुंग यांनी प्रत्येकी दोन गोल केले.
सलामीच्या या लढतीत उदिताने सामन्याच्या 30 व्या आणि 52 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केले, तर डुंगडुंगने 45 व्या आणि 54 व्या मिनिटाला गोल केले. भारतासाठी इतर गोल करणार्या खेळाडूंमध्ये मुमताज खान (7 व्या मिनिटाला), संगीता कुमारी (10 व्या), नवनीत कौर (16 व्या), लालरेमसियामी (18 व्या), थौदम सुमन देवी (49 व्या), शर्मिला देवी (57 व्या) आणि रुतजा दादासो पिसाळ (60 व्या) यांचा समावेश होता.
भारताने 30 व्या स्थानावर असलेल्या थायलंडविरुद्धच्या पूल बीमधील या सामन्यात मध्यंतरापर्यंत 5-0 अशी आघाडी घेतली होती. या सामन्यात भारताला एकूण नऊ पेनल्टी कॉर्नर मिळाले, त्यापैकी पाचमध्ये गोल करण्यात यश आले, तर थायलंडला एकही पेनल्टी कॉर्नर मिळाला नाही. भारताने सामन्याच्या सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. मुमताज आणि संगीता यांनी दोन फील्ड गोल केले. त्यानंतर भारताने आपले आक्रमण अधिक धारदार करत आणखी तीन गोलची भर घातली. नवनीत आणि लालरेमसियामी यांनी लागोपाठ एक-एक फील्ड गोल केला, त्यानंतर उदिताने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. दुसर्या हाफमध्येही भारताने आपला आक्रमक खेळ कायम ठेवला. भारताने चार पेनल्टी कॉर्नर मिळवले, त्यापैकी डुंगडुंगने 45 व्या मिनिटाला एकावर गोल केला. अखेरीस क्वार्टरमध्ये भारताने आपला वेग वाढवला आणि पाच गोल करून मोठ्या विजयाची नोंद केली.
या आशिया चषक स्पर्धेचा विजेता संघ 2026 साली बेल्जियम आणि नेदरलँडस्मध्ये होणार्या महिला विश्वचषकासाठी पात्र ठरेल. थायलंडविरुद्धच्या सामन्यानंतर भारत शनिवारी जपानशी आणि त्यानंतर 8 सप्टेंबरला सिंगापूरशी आपला अंतिम पूल सामना खेळेल.