David Johnson Death : भारताच्या माजी क्रिकेटरने जीवन संपवले, चौथ्या मजल्यावरून मारली उडी

David Johnson Death : भारताच्या माजी क्रिकेटरने जीवन संपवले, चौथ्या मजल्यावरून मारली उडी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचे माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड ज्युड जॉन्सन यांचा गुरुवारी (दि. 20) त्यांच्या बेंगळुरू येथील अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. ते 52 वर्षांचे होते. मानसिक स्थिती ठीक नसल्याने जॉन्सन यांनी जीवन संपवल्याची चर्चा आहे. कोट्टनूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

कर्नाटकचे प्रतिनिधित्व

जॉन्सन यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी 39 प्रथम श्रेणी आणि 33 लिस्ट ए सामने खेळले. या दरम्यान, त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 28.63 च्या सरासरीने आणि 47.4 च्या स्ट्राइक रेटने 125 बळी घेतले. तसेच त्यांच्या नाववर एक शतक आहे. तर लिस्ट ए सामन्यात जॉन्सन यांनी 41 विकेट घेतल्या. 2015 मध्ये ते कर्नाटक प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसले होते.

जॉन्सन यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

16 ऑक्टोबर 1971 रोजी जन्मलेल्या डेव्हिड जॉन्सन यांनी यांनी भारतासाठी दोन कसोटी सामने खेळले. त्यांनी ऑक्टोबर 1996 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दिल्ली कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जवागल श्रीनाथ जखमी झाल्यामुळे त्यांना त्या सामन्यात संधी मिळाली. या कालावधीत उजव्या हाताचे वेगवान गोलंदाजी करणा-या जॉन्सन यांनी 47.66 च्या सरासरीने 3 बळी घेतले. त्यानंतरच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही ते भारतीय संघाचा भाग होते. त्यांना पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान, जॉन्सन यांनी हर्शल गिब्स आणि ब्रायन मॅकमिलन यांच्या विकेट घेतल्या. डर्बनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा हा त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना ठरला.

वेग होता, पण नियंत्रण नव्हते

वेगात क्षमता दाखवूनही जॉन्सन यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार काळ टिकली नाही. त्याचे एक कारण म्हणजे त्यांचे चेंडूंवर नियंत्रण नसणे. जॉन्सन यांनी भारतासाठी एकही एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये ते कर्नाटककडून खेळले. देशांतर्गत स्पर्धांमध्ये संघाच्या यशात त्यांनी योगदान दिले.

क्रिकेट जगताची प्रतिक्रिया-

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी 'एक्स' वर लिहिले, 'टीम इंडियाचे माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड जॉन्सन यांना श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयप्रती मनापासून शोक व्यक्त करतो. खेळातील त्यांचे योगदान नेहमीच लक्षात ठेवले जाईल.'

भारताचे माजी कर्णधार अनिल कुंबळे यांनी म्हटलंय की, 'माझा क्रिकेट पार्टनर डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक. 'बेनी' तू खूप लवकरच गेलास!'

भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने लिहिले की, 'डेव्हिड जॉन्सनच्या निधनाने दु:ख झाले आहे. देव त्याच्या कुटुंबीयांना आणि प्रियजनांना या दु:खद प्रसंगातून सावरण्यासाठी शक्ती देवो.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news