Indian Archery: महाराष्ट्रातील युवा तिरंदाजांच्या संघर्षाची सुवर्ण यशोगाथा

कठोर परिश्रमाच्या बळावर आशियाई क्रीडा स्पर्धांपर्यंत झेप
Indian Archery
Indian ArcheryPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: अमरावतीची कुमकुम मोहोद हिने तिरंदाजीला सुरुवात केली, तेव्हा या खेळासाठी आवश्यक साहित्याचा खर्च उचलणेही तिच्या कुटुंबासाठी मोठे आव्हान होते. तिचे वडील अनिल मोहोद यांनी मुलीसाठी तिरंदाजीचे पहिले बूट ४०० रुपयांना खरेदी केले होते.

पारंपरिक भारतीय लाकडी धनुष्याऐवजी रिकर्व्ह धनुष्याचा वापर सुरू केल्यानंतर बुटांच्या पुढील जोडीसाठी त्यांना १,६०० रुपये खर्च करावे लागले.

मात्र, आज वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी कुमकुमकडे बुटांच्या दहा जोड्या आणि तीन धनुष्ये आहेत. तिच्या कामगिरीमुळे प्रायोजकही तिच्याकडे आकर्षित होऊ लागले आहेत. २०२६च्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिचा समावेश झाला आहे.

कुमकुमचा हा प्रवास अनेक त्यागांनी भरलेला आहे. कोविड महामारीच्या काळात एकदा तिच्याकडील बाण तुटले तर नवीन बाण खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने काय करायचे, या चिंतेने ती रडू लागली होती.

Indian Archery
Cristiano Ronaldo Ban: रोनाल्डोला मोठा धक्का! ३० दिवसांची बंदी आणि २५५ युरो दंड; नेमकं काय घडलं?

बाणांच्या कमतरतेचा आपल्या कामगिरीवर परिणाम होत असल्याचीही तिला चिंता होती. मुलीची ही अवस्था पाहून दुसऱ्याच दिवशी वडील अनिल यांनी १५ हजार रुपये खर्च करून तिला नवीन बाण खरेदी करून दिले.

यापुढे बाणांची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले. मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दहा वर्षांची बचत खर्च केल्यानंतर त्यांनी अखेर मिठाईच्या डब्यांच्या निर्मितीचा स्वतःचा व्यवसायही विकला.

या प्रवासाची आठवण सांगताना ते म्हणतात, “कुमकुमच्या आईचे स्वप्न होते की तिने तिरंदाज व्हावे. माझ्या आयुष्यातील दोन सर्वांत महत्त्वाच्या महिलांना मी निराश कसे करू शकलो असतो?”

पृथिकाची सुवर्णभरारी

पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथील १८ वर्षीय पृथिका प्रदीप हिचा तिरंदाजीचा प्रवास पाचवीत असताना शाळेत झालेल्या एका उपक्रमातून सुरू झाला. या खेळाविषयीची आवड वाढल्यानंतर एका वर्षाने तिने व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. कालांतराने ही आवड दृढ निष्ठेत आणि जिद्दीत परिवर्तित झाली.

Indian Archery
Deepti Jeevanji: आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्णभरारी! दीप्तीचे नव्या विक्रमासह सुवर्णपदक

आज पृथिका पिंपळे गुरव येथील तिरंदाजी केंद्रात प्रशिक्षक कुणाल तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. आई-वडील प्रिया आणि प्रदीप यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे तिने अभ्यास आणि कठोर प्रशिक्षण यांचा समतोल साधला. तिच्या मेहनतीचे फलित २०२६च्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतासाठी मिळवलेल्या सुवर्णपदकाच्या रूपाने समोर आले.

साहिल जाधव यांची जिद्द आणि शिस्त

साताऱ्याचा २५ वर्षीय साहिल जाधव याच्यासाठी तिरंदाजी हा आता केवळ खेळ राहिलेला नसून जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. प्रशिक्षक प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणाऱ्या साहिलने शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती आणि सातत्याने कामगिरीत सुधारणा करण्यावर आपल्या कारकिर्दीचा पाया उभारला आहे.

आर्थिक अडचणी असूनही साहिलच्या आई-वडिलांनी त्याला प्रशिक्षण, आवश्यक साहित्य आणि विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. भारतीय संघाची जर्सी परिधान करण्याचा अर्थ केवळ स्वतःची स्वप्ने पूर्ण करणे नसून आई-वडिलांच्या स्वप्नांनाही पुढे घेऊन जाणे, असा साहिलचा विश्वास आहे.

संस्थात्मक पाठबळही महत्त्वाचे

या तिन्ही खेळाडूंच्या यशोगाथा क्रीडा क्षेत्रातील यशाचे विविध पैलू अधोरेखित करतात. कुटुंबीयांनी केलेले त्याग, लहान वयातच प्रतिभेला योग्य दिशा देण्याचे महत्त्व आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आवश्यक असलेली शिस्त, हे या प्रवासाचे प्रमुख आधार आहेत.

त्याचबरोबर, खेळाडूंची मेहनत आणि दृढनिश्चय यांना संस्थात्मक पातळीवरील सातत्यपूर्ण पाठबळाची जोड मिळणेही तितकेच आवश्यक आहे. योग्य प्रशिक्षण, दर्जेदार साहित्य, आर्थिक मदत आणि स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या संधी उपलब्ध झाल्यास ग्रामीण तसेच निमशहरी भागांतील प्रतिभावान खेळाडूंनाही आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी मिळू शकते.

एनटीपीसीचा पुढाकार

भारतीय तिरंदाजीला प्रोत्साहन देण्यासाठी एनटीपीसी २०१८पासून आपल्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्वाच्या (सीएसआर) उपक्रमांतर्गत योगदान देत आहे. राष्ट्रीय क्रीडा विकास निधी (NSDF), भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) आणि भारतीय तिरंदाजी संघटना (AAI) यांच्या माध्यमातून या उपक्रमासाठी १५२.८८ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची वचनबद्धता व्यक्त करण्यात आली आहे.

या सहकार्यामध्ये सुरुवातीच्या स्तरावर प्रतिभावान खेळाडूंची ओळख पटवणे, त्यांना प्रशिक्षण देणे, आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध करून देणे, शिष्यवृत्ती देणे, तिरंदाजी अकादमींना पाठबळ देणे आणि विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या संधी उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.

‘धनुर्विद्या प्रकल्पा’तून संधी

एनटीपीसीच्या या प्रयत्नांमध्ये ‘धनुर्विद्या प्रकल्प’ हा महत्त्वाचा उपक्रम आहे. तिरंदाजीच्या क्षेत्रात अगदी प्राथमिक स्तरावर प्रवेश करणाऱ्या खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण आणि आवश्यक संधी उपलब्ध करून देत त्यांना उच्चस्तरीय स्पर्धांपर्यंत पोहोचवणे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

या उपक्रमांतर्गत महिला खेळाडू आणि पॅरा-तिरंदाजांनाही संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. योग्य मार्गदर्शन, पुरेशा सुविधा आणि आर्थिक पाठबळ यांच्या मदतीने नवोदित खेळाडूंना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करता यावे, हा यामागील हेतू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news