पुढारी ऑनलाईन डेस्क
टीम इंडियाने नुकतेच दक्षिण आफ्रिकेला हरवून टी२० वर्ल्डकपवर आपले नाव कोरले. आता बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाबाबत मोठी घोषणा केली आहे. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा याच्याकडे कायम राहील, असे जय शहा यांनी म्हटले आहे.
टी-२० वर्ल्ड कप विजेतेपदासाठी टीम इंडियाचे नेतृत्व केल्यानंतर, रोहित शर्मा आता आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारताचे नेतृत्व करेल. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी आशा व्यक्त केली आहे की भारताला फायनलमध्ये नेण्यासाठी रोहित शर्मा याच्याकडेच संघाचे नेतृत्व कायम राहील आणि तो दोन्ही स्पर्धांमध्ये ट्रॉफी देखील उंचावेल.
२९ जून रोजी बार्बाडोस येथे झालेल्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सात धावांनी विजय मिळवून भारताने ११ वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. रविवारी शेअर केलेल्या एका व्हिडिओ संदेशात शहा यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२३-२५ आणि २०२५ मध्ये होणाऱ्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी कर्णधार म्हणून रोहित शर्माच राहील, अशी पुष्टी केली आहे.
"मला विश्वास आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया WTC फायनल आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल," असे शहा यांनी म्हटले आहे. "मी टी२० वर्ल्ड कपच्या ऐतिहासिक विजयासाठी टीम इंडियाचे अभिनंदन करत आहे. मला हा विजय कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रवींद्र जडेजा यांना समर्पित करायचा आहे. गेल्या वर्षभरातील आमची ही तिसरी फायनल आहे. आम्हाला ऑस्ट्रेलियात ओव्हलमध्ये जून २०२३ मध्ये अपयश आले. पण नोव्हेंबर २०२३ मध्ये आम्ही १० विजय (एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत) मिळवले आणि लोकांची मने जिंकली. पण ODI वर्ल्ड कप जिंकू शकलो नाही (भारत ऑस्ट्रेलियाकडून हरला)," अशी खंत शहा यांनी व्यक्त केली.
टी२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहितने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्तीची घोषणा केली होती. अलविदा होण्याची ही योग्य वेळ असल्याचे त्याने म्हटले होते. रोहित पाठोपाठ विराट कोहलीने काही मिनिटांत T20I मधून निवृत्ती जाहीर केली होती.