पुढारी ऑनलाईन डेस्क : टी-20 विश्वचषक जिंकलेल्या टीम इंडियाचे गुरुवारी (दि.4) मुंबईत लाखो चाहत्यांच्या उपस्थितीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मरिन ड्राईव ते वानखेडे स्टेडियम रस्त्यावर विश्वविजेत्या संघाचे ओपन बसमधून विजय परेड काढण्यात आली. टीम इंडियाच्या विश्वविजेत्या संघात चार खेळाडू मुंबईचे आहेत. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या खेळाडूंना प्रत्येकी एक कोटी रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आज महाराष्ट्र विधीमंडळात विश्वविजेत्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आनि अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती निलम गो-हे यांच्यासह मंत्री, सर्वपक्षीय आमदार उपस्थित होते.
या कार्यक्रमात भाषण करण्यासाठी रोहित शर्मा ज्यावेळी आला तेव्हा सर्व आमदारांनी त्याचा जयघोष केला. मुंबईचा राजा रोहित शर्मा अशा घोषणांनी सभागृह निनादून गेले. रोहितने त्याचे भाषण मराठीत केले. आपल्या भाषणाची सुरूवात त्याने सर्वांना मोठा नमस्कार असे म्हणून केली. सीएम सर धन्यवाद तुम्ही आम्हाला इथे आमंत्रित केले. बर वाटले सर्वांना पाहून. सीएम साहेबांनी आताच मला सांगितले की अशा प्रकारचा कार्यक्रम कधी झाला नाही इकडे. अशा कार्यक्रम आमच्यासाठी होतो आहे याचा आनंद आहे. तुम्हा सर्वांना पाहून आम्हाला आनंद झाला आहे. काल मुंबईत आम्ही जे पाहिले ते सर्वांसाठी स्वप्न होते. आमचे स्वप्न होते की वर्ल्डकप भारतात आणायचा होता. 11 वर्ष आम्ही थांबलो होतो वर्ल्डकपसाठी. 20213 साली शेवटची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. मी संघातील सहकाऱ्यांचा आभारी आहे. हे माझ्यामुळे किंवा सूर्या किंवा शिवम किंवा यशस्वीमुळे झाले नाही. सर्व खेळाडूंच्या अथक परिश्रमामुळे हे शक्य झाले आहे. मी लकी देखील आहे की मला जी टीम भेटली ती जबरदस्त होती. प्रत्येक सामन्यात सर्वांनी योगदान दिले त्यामुळे आपण जिंकलो, असे रोहित म्हणाला.
रोहित शर्माने आपल्या भाषणावेळी सूर्यकुमारच्या ऐतिहासिक कॅचचा उल्लेख केला. रोहित शर्मा म्हणाला, सूर्या म्हणाला की तो बॉल माझ्या हातात येऊन बसला. मी म्हणतो बरं झालं सूर्याच्या हातात बॉल बसला. जर बसला नसता तर मी त्यालाच बसवला असता,’ अशी मिश्कील टीप्पणी त्याने केली. रोहितपूर्वी सूर्याने देखील मराठीतून भाषण केलं होतं. त्यावेळी मिलरच्या कॅचचा उल्लेख झाला.