

टॉस जिंकून प्रथम फलंदाजीस उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाचा पहिला डाव अवघ्या १६२ धावांवर आटोपला. पाहुण्या संघाने केवळ साडेचार तासांच्या आतच सर्व गडी गमावले. वेस्ट इंडिजकडून जस्टिन ग्रीव्सने सर्वाधिक ३२ धावा केल्या. भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने चार आणि जसप्रीत बुमराहने तीन बळी घेतले. याव्यतिरिक्त, कुलदीप यादवला दोन आणि वॉशिंग्टन सुंदरला एक बळी मिळाला. वेस्ट इंडिजचा डाव लवकर संपुष्टात आल्यामुळे पंचांनी वेळेआधीच चहापानाची (टी ब्रेक) घोषणा केली.
पाहुण्या वेस्ट इंडिज संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. पहिल्या तासातच संघाने ४२ धावांत चार महत्त्वपूर्ण गडी गमावले. सिराजने भेदक मारा करत तेजनारायण चंद्रपॉल (०), ब्रँडन किंग (१२) आणि एलिक एथनाजे (१३) यांना तंबूत पाठवले. तर, बुमराहने जॉन कॅम्पबेलला (८) बाद केले. यानंतर, कर्णधार रोस्टन चेस आणि शाई होप यांनी पाचव्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी रचत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुलदीप यादवने होपला (२६) त्रिफळाचित केले आणि याच विकेटसह पंचांनी लंचची घोषणा केली.
लंचनंतर सिराजने पुन्हा एकदा दे धक्का दिला. त्याने रोस्टन चेसचा (२४) अडसर दूर केला. त्यानंतर सुंदरने खेरी पियरेला (११) पायचीत बाद केले. बुमराहने आपल्या घातक यॉर्करचा मारा करून जस्टिन ग्रीव्स (३२) आणि जोहान लेन (१) या दोघांनाही क्लीन बोल्ड केले. अखेरीस, कुलदीप यादवने वॉरिकनला (८) यष्टिरक्षक जुरेलकरवी झेलबाद करून वेस्ट इंडिजचा डाव १६२ धावांवर संपुष्टात आणला.
कर्णधार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करताना शुभमन गिलने सलग सहावा टॉस गमावला. क्रिकबझच्या वृत्तानुसार, गिलने आता न्यूझीलंडच्या टॉम लॅथमच्या कर्णधारपदाच्या सुरुवातीच्या काळात सलग ६ टॉस गमावण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. यासह गिलने कपिल देव यांनाही मागे टाकले, ज्यांनी १९८३ मध्ये त्यांच्या कसोटी कर्णधारपदाच्या सुरुवातीला सलग ५ टॉस गमावले होते. सर्वाधिक टॉस गमावण्याचा 'नकोसा' विक्रम न्यूझीलंडच्या बेन कॉन्गडनच्या (७) नावावर आहे.