

आशिया चषक 2025 मधील सर्वात मोठा सुपरस्टार ठरलेल्या अभिषेक शर्माने आता आयसीसी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत (ICC T20I Rankings) नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. आशिया चषक स्पर्धेत ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ ठरलेला अभिषेक शर्मा गेल्या काही काळापासून टी-20 क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर आहे आणि आता त्याने सर्वाधिक रेटिंग मिळवणारा फलंदाज म्हणून नवा मानदंड स्थापित केला आहे. एका क्षणात त्याने विराट कोहली सारख्या दिग्गज फलंदाजाला मागे टाकले आहे.
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या आयसीसी क्रमवारीत रेटिंग मिळवण्याच्या बाबतीत कोणत्याही खेळाडूला 920 रेटिंगचा टप्पा गाठता आला नव्हता, परंतु अभिषेक शर्माने 931 रेटिंगपर्यंत मजल मारली आहे. हा आकडा गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रेटिंग मिळवण्याचा विक्रम इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलान याच्या नावावर होता. त्याने ९१९ रेटिंगपर्यंत मजल मारली होती, मात्र अभिषेकने त्याला मागे टाकले आहे.
या यादीत आता सूर्यकुमार यादव 912 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहे, हा आकडा त्याने अव्वल असताना गाठला होता. विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. त्याने आयसीसी टी-20 क्रमवारीत 909 रेटिंग मिळवले होते. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार ॲरॉन फिंच 904 रेटिंगसह पाचव्या स्थानावर असून, पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम 900 रेटिंगसह सहाव्या स्थानावर आहे.
अभिषेक शर्मा (भारत) : 931 रेटिंग
डाविड मलान (इंग्लंड) : 919 रेटिंग
सूर्यकुमार यादव (भारत) : 912 रेटिंग
विराट कोहली (भारत) : 909 रेटिंग
ॲरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया) : 904 रेटिंग
बाबर आझम (पाकिस्तान) : 900 रेटिंग
टी-20 आशिया कपचे आतापर्यंत तीन हंगाम खेळले गेले आहेत, पण कोणत्याही फलंदाजाला 300 धावा करता आल्या नव्हत्या. तथापि, 2025 च्या हंगामात अभिषेक शर्माने हा विक्रमही आपल्या नावावर केला. त्याने 7 सामन्यांमध्ये 314 धावा कुटल्या. त्याचा स्ट्राइक रेट 200 इतका प्रभावी होता. संपूर्ण स्पर्धेत संघासाठी इतक्या वेगवान गतीने धावा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.