Football Controversy : फुटबॉलच्या मैदानात भारतीय खेळाडूच्या डोक्यावर जीवघेणा प्रहार, पॅलेस्टाईनच्या खेळाडूंची गुंडगिरी (Video)

India vs Palestine football U17 Asian Cup : भारतीय कर्णधाराशी वर्णद्वेषी वर्तन
Football Controversy : फुटबॉलच्या मैदानात भारतीय खेळाडूच्या डोक्यावर जीवघेणा प्रहार, पॅलेस्टाईनच्या खेळाडूंची गुंडगिरी (Video)
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : एएफसी (AFC) १७ वर्षांखालील आशियाई चषक २०२७ पात्रता फेरीतील भारत आणि पॅलेस्टाईन यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना फुटबॉलपेक्षा पॅलेस्टाईनच्या खेळाडूंच्या अमानुष आणि संतापजनक वर्तनामुळे गाजला. गटात अव्वल स्थान पटकावण्यासाठी सुरू असलेल्या या अटीतटीच्या लढतीत पॅलेस्टाईनच्या खेळाडूंनी खिलाडूवृत्तीला काळिमा फासत मैदानाला जणू आखाड्याचे स्वरूप दिले.

सुरुवातीपासूनच पॅलेस्टाईनची चिथावणीखोर खेळी

सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच पॅलेस्टाईनच्या खेळाडूंनी भारतीय 'ब्लू कोल्ट्स'ना डिवचण्यासाठी अत्यंत खडतर आणि अनावश्यक आक्रमक खेळ सुरू केला. याचा कहर सामन्याच्या नवव्याच मिनिटाला पाहायला मिळाला. पॅलेस्टाईनचा खेळाडू मोहम्मद जमहूर याने एका भारतीय फुटबॉलपटूला मागून दोनदा लाथ मारली आणि तो खाली कोसळल्यानंतर त्याच्या हातावर जणीवपूर्वक पाय दिला. या कृत्यानंतर जमहूरने अजाण असल्याचा कांगावा केला, मात्र पंचांनी कोणतीही दयामाया न दाखवता त्याला थेट 'रेड कार्ड' दाखवून मैदानाबाहेर हाकलले. परिणामी, पॅलेस्टाईनला उर्वरित सामना १० खेळाडूंसह खेळावा लागला.

Football Controversy : फुटबॉलच्या मैदानात भारतीय खेळाडूच्या डोक्यावर जीवघेणा प्रहार, पॅलेस्टाईनच्या खेळाडूंची गुंडगिरी (Video)
India SAFF Champion : भारताने पाकिस्तानला फुटबॉलमध्येही लोळवळे! पटकावले १० वे 'सॅफ' अजिंक्यपद

डोक्यावर जीवघेणा प्रहार आणि मैदानात खळबळ

१० खेळाडूंवर येऊनही पॅलेस्टाईनची गुंडगिरी थांबली नाही. सामन्याच्या पहिल्या सत्रात एका पॅलेस्टिनी खेळाडूने भारतीय खेळाडूच्या थेट डोक्यावर अत्यंत भयंकर पद्धतीने किक मारली. हा जीवघेणा प्रहार इतका भीषण होता की मैदानातील खेळाडू आणि प्रेक्षकांचाही काही क्षण श्वास रोखला गेला.

कॅमेऱ्यात कैद झाले वर्णद्वेषी कृत्य

शारीरिक हल्ल्यांसोबतच पॅलेस्टाईनच्या खेळाडूंनी मानसिक खच्चीकरण करण्याचाही नीच प्रयत्न केला. थेट प्रक्षेपण सुरू असताना पॅलेस्टाईनचा १९ क्रमांकाचा खेळाडू भारतीय संघाचा कर्णधार दल्लालमुओन गँगटे याच्याजवळ जाऊन नाकासमोर हात हलवत (दुर्गंधी येत असल्याचा इशारा करत) आक्षेपार्ह हावभाव करताना कॅमेऱ्यात कैद झाला. या संतापजनक वर्णद्वेषी कृत्यामुळे क्रीडाविश्वात संतापाची लाट उसळली आहे. मात्र, इतका गंभीर प्रकार घडूनही पंचांनी या खेळाडूवर कोणतीही कारवाई न केल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

'ब्लू कोल्ट्स'चा संयमी खेळ आणि मध्यंतरापर्यंत १-१ बरोबरी

प्रतिस्पर्ध्यांच्या या सर्व चिथावणीला आणि हिंसक खेळाला भारतीय युवा संघाने अत्यंत संयमाने आणि खेळाने चोख प्रत्युत्तर दिले. भारताने सामन्याची आक्रमक सुरुवात करत पहिला गोल (Opening Goal) नोंदवून पॅलेस्टाईनवर दबाव निर्माण केला होता. मात्र, त्यानंतर पॅलेस्टाईनने मिळालेल्या पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करत सामन्यात बरोबरी साधली.

मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीत आहेत. आता दुसऱ्या सत्रातील निर्णायक ४५ मिनिटांत भारतीय संघ या अमानुष वर्तनाचा मैदानावर कसा हिशोब चुकता करतो आणि विजयाचा झेंडा फडकवतो का, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.