IND vs NZ T20 : ऑकलंडमध्ये भारताचा दारुण पराभव; टी-२० इतिहासातील दुसऱ्या मोठ्या नामुष्कीची नोंद

फिलिप्स-ब्रेसवेलचे वादळ, भारताची शरणागती : १७२ धावांत खेळ खल्लास
IND vs NZ T20 : ऑकलंडमध्ये भारताचा दारुण पराभव; टी-२० इतिहासातील दुसऱ्या मोठ्या नामुष्कीची नोंद
Published on: 
Updated on: 

ऑकलंड : न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ऑकलंडच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या या लढतीत न्यूझीलंडने दमदार पुनरागमन करत भारतावर तब्बल ८७ धावांनी एकतर्फी विजय मिळवला. चालू मालिकेत न्यूझीलंडचा हा पहिलाच विजय ठरला असला, तरी या पराभवामुळे भारतीय संघाच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धावांच्या फरकाने दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या पराभवाची नोंद झाली आहे.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना भारताविरुद्ध २५९ धावांचा महाप्रचंड डोंगर उभारला. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध कोणत्याही संघाने नोंदवलेली ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली आणि अपेक्षेनुसार प्रतिकार करण्यात अपयशी ठरल्याने संघाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला.

धावांच्या फरकाचा विचार करता, भारताचा टी-२० आंतरराष्ट्रीय इतिहासातील सर्वात मोठा पराभव इंग्लंडविरुद्ध झाला होता. नॉटिंगहॅम येथे झालेल्या त्या सामन्यात भारतीय संघाला १२५ धावांनी नामुष्की पत्करावी लागली होती. त्यावेळी इंग्लंडने ७ बाद २०१ धावा केल्या होत्या, तर प्रत्युत्तरात भारतीय संघ अवघ्या ११.४ षटकांत ७६ धावांवर गारद झाला होता. आता या यादीत ऑकलंड येथील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या सामन्याची भर पडली असून, ८७ धावांच्या पराभवासह तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. विजयासाठी आवश्यक असलेल्या २६० धावांच्या आव्हानासमोर भारतीय संघाला ९ बाद १७२ धावांपर्यंतच मजल मारता आली. यापूर्वी २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच भारताचा ८० धावांनी पराभव झाला होता, जो आता तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे; तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अहमदाबाद येथे भारताने ७६ धावांनी पराभव पत्करला होता.

या लढतीत न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच अत्यंत आक्रमक पवित्रा घेत भारतीय गोलंदाजांवर चौफेर हल्ला चढवला. ग्लेन फिलिप्सने अवघ्या ४९ चेंडूंत १०७ धावांची वादळी शतकी खेळी साकारली, तर मायकेल ब्रेसवेलने केवळ २५ चेंडूंत धडाकेबाज ६५ धावांची आतषबाजी केली. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी अवघ्या ४१ चेंडूंत ११५ धावांची विक्रमी भागीदारी करत भारतीय गोलंदाजीची अक्षरशः पिसे काढली.

तत्पूर्वी, वेगवान गोलंदाज मयांक यादवने टीम सायफर्ट आणि डॅरिल मिचेल यांना माघारी धाडत यजमान संघाला सुरुवातीला धक्के दिले होते. त्यानंतर फिलिप्स आणि ॲलन यांनी तिसऱ्या गड्यासाठी ५९ धावांची भागीदारी रचून डाव सावरला. ॲलन आणि बेव्हन जेकब्स लागोपाठ बाद झाल्याने न्यूझीलंडचा धावगतीचा वेग काही काळ मंदावल्याचे दिसले; मात्र त्यानंतर मैदानात उतरलेल्या ब्रेसवेलने फिलिप्सच्या साथीने सामन्याचे चित्रच पालटून टाकले.

फिलिप्सने प्रिन्स यादवच्या एकाच षटकात एक षटकार आणि तीन चौकार ठोकत आक्रमक रूप धारण केले. त्यानंतर त्याने नितीश कुमार रेड्डीच्या गोलंदाजीवरही चौफेर फटकेबाजी केली. अवघ्या ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर, १६ व्या षटकात फिलिप्सने रेड्डीच्या गोलंदाजीवर एका चौकारासह चार गगनचुंबी षटकार खेचत तब्बल ३२ धावा लुटल्या. दुसऱ्या बाजूने ब्रेसवेलनेही भारतीय गोलंदाजीवर जोरदार प्रहार केला. त्याने डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलच्या एकाच षटकात सलग तीन चौकार आणि एक षटकार लगावला. ब्रेसवेलने अवघ्या १८ चेंडूंत आपले झंझावाती अर्धशतक झळकावून न्यूझीलंडला २५९ धावांच्या ऐतिहासिक धावसंख्येपर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.