

ayush mhatre vaibhav suryavanshi u19 team india england tour bcci announced squad
भारतीय वरिष्ठ संघ 20 जूनपासून इंग्लंड दौऱ्याला सुरुवात करणार आहे, ज्यासाठी सर्व चाहते संघाच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, टीम इंडियाचा 19 वर्षांखालील संघ देखील जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे, ज्यासाठी बीसीसीआयने गुरुवारी (22 मे) संघ आणि दौ-याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. संघाचा हा दौरा 24 जूनपासून सुरू होईल आणि 23 जुलैपर्यंत चालेल.
या संघात यंदाच्या आयपीएलमधील दोन युवा स्टार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी यांचे नशीब उजळले आहे. चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर आयुषला भारताच्या U19 संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर 14 वर्षीय वादळी फलंदाज वैभव सूर्यवंशीलाही संघात स्थान मिळाले आहे.
आयुषचा चेन्नई सुपर किंग्ज आणि वैभवचा राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आयपीएल 2025 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू पहिल्या सामन्यापासून उपलब्ध होऊ शकतात.
आयुष आणि वैभव दोघांनीही आयपीएल 2025 मध्ये त्यांच्या बॅटने जोरदार प्रभाव पाडला. आयुषने 6 सामन्यांमध्ये 34.33च्या सरासरीने आणि 187.27 स्ट्राईक रेटने 206 धावा केल्या. 17 वर्षीय म्हात्रेने 9 प्रथम श्रेणी सामने आणि 7 लिस्ट-ए सामने खेळले आहेत. आयपीएलच्या या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा नियमीत कर्णधार ऋतुराज गायकवाड जखमी झाला. कोपराच्या दुखापतीमुळे तो सुरुवातीचे काही सामने खेळून संपूर्ण हंगामातून बाहेर पडला. त्यानंतर सीएसके फ्रँचायझीने मुंबईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रेची निवड केली. आयुषनेही या संधीचे सोने केले आणि यंदाचा हंगाम गाजवत सर्वांचे लक्षवेधून घेतले.
वैभव सूर्यवंशीने वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी आयपीएलमध्ये धमाकेदार पदार्पण केले. त्याने आयपीएलमध्ये भारतीय खेळाडू म्हणून सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रमही नोंदवला. वैभवने त्याच्या पहिल्या आयपीएल हंगामात 7 सामने खेळले. ज्यात त्याने 36 च्या सरासरीने आणि 206.55 च्या स्ट्राईक रेटने 252 धावा तडकावल्या. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एक शतक आणि एक अर्धशतक झळकले. गेल्या वर्षी चेन्नई येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया अंडर-19 विरुद्धच्या पहिल्या युवा कसोटीत सूर्यवंशीने शतक झळकावले होते.
आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंग चावडा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आरएस अंबरीश, कनिष्क चौहान, खिलान पटेल, हेनिल पटेल, युधाजीत गुहा, प्रणव राघवेंद्र, मोहम्मद एनान, आदित्य राणा, अनमोलजीत सिंग
स्टँडबाय खेळाडू : नमन पुष्पक, डी दिपेश, वेदांत त्रिवेदी, विकल्प तिवारी, अलंकृत रापोल (यष्टीरक्षक)
24 जून : सराव सामना (लॉफबरो विद्यापीठ)
27 जून : पहिला एकदिवसीय सामना (होव्ह)
30 जून : दुसरा एकदिवसीय सामना (नॉर्थम्प्टन)
2 जुलै : तिसरा एकदिवसीय सामना (नॉर्थम्प्टन)
5 जुलै : चौथा एकदिवसीय सामना (वॉर्सेस्टर)
7 जुलै : पाचवा एकदिवसीय सामना (वॉर्सेस्टर)
12-15 जुलै : पहिला चार दिवसीय सामना (बेकेनहॅम)
20-23 जुलै : दुसरा चार दिवसीय सामना (चेम्सफोर्ड)