

Ind vs Eng Test :
लीड्स : भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट यांच्यातील चुरशीची लढत पुन्हा एकदा चांगलीच रंगली. लीड्स कसोटीत दुसऱ्या दिवशी बुमराहने रूटला बाद करत इंग्लंडला मोठा धक्का दिला. रूटने पहिल्या डावात ५८ चेंडूत २८ धावा केल्या, परंतु बुमराहच्या अचूक गोलंदाजीसमोर तो टिकू शकला नाही.
भारताचा पहिला डाव ४७१ धावांवर आटोपला होता. प्रत्युत्तरात, इंग्लंडने ओली पोपचे शतक आणि बेन डकेटच्या अर्धशतकाच्या जोरावर दिवसअखेर पहिल्या डावात तीन गडी गमावून २०९ धावा केल्या आहेत. इंग्लंडचा संघ अजूनही भारतापेक्षा २६२ धावांनी मागे आहे. भारताने चांगली सुरुवात करत जॅक क्रावलीला स्वस्तात बाद केले, तो चार धावा करून तंबूत परतला. यानंतर पोप आणि डकेटने दुसऱ्या विकेटसाठी १२२ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. बुमराहने डकेटला ६२ धावांवर त्रिफळाचीत केले. अखेरीस, बुमराहने जो रूटचीही विकेट घेतली. बुमराहच्या चेंडूवर रूट स्लिपमध्ये करुण नायरकडे झेल देऊन बसला. रूट भारतासाठी मोठा धोका ठरू शकला असता, पण त्याआधीच बुमराहने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
यासह, बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये रूटला सर्वाधिक वेळा बाद करणारा संयुक्तपणे दुसरा गोलंदाज ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये २५ डावांमध्ये बुमराहने रूटला १० वेळा बाद केले आहे, तर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडनेही ३१ डावांमध्ये रूटला इतक्याच वेळा बाद केले आहे. कसोटीत रूटला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सच्या नावावर आहे, त्याने ३१ डावांमध्ये ११ वेळा पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.
बुमराह आणि रूट यांच्यात कसोटी क्रिकेटमध्ये नेहमीच एक रंजक लढत पाहायला मिळते. दोघांमध्ये कसोटी क्रिकेटमधील स्पर्धा तीव्र असते, पण अनेकदा बुमराह रूटला बाद करण्यात यशस्वी ठरला आहे. कसोटीतील दोघांच्या आमना-सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, २५ डावांमध्ये बुमराहने रूटला ५७० चेंडू टाकले आहेत, ज्यात रूटने २९ च्या सरासरीने २९० धावा केल्या आहेत, तर तो १० वेळा बळी ठरला आहे.