

लीडस् : येथील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शेवटचे 7 बळी अवघ्या 41 धावांत गमावल्यानंतरही केवळ ऋषभ पंत (134), यशस्वी जैस्वाल (101) आणि कर्णधार शुभमन गिलच्या (147) तडाखेबंद शतकामुळे भारताला आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 471 धावांपर्यंत मजल मारता आली. मात्र, प्रारंभीची आक्रमक फलंदाजी पाहता साडेपाचशे-सहाशे हे धावांचा माईलस्टोनही सहज सर करता येईल, असे चित्र असतानाच या पडझडीमुळे भारतीय संघाची बर्याच प्रमाणात निराशाही झाली. प्रत्युत्तरात दुसर्या दिवसअखेर इंग्लंडने देखील 49 षटकांत 3 बाद 209 असे चोख प्रत्युत्तर दिले. इंग्लंडतर्फे ऑली पोप 131 चेंडूंत 100 तर हॅरी ब्रूक शून्यावर नाबाद राहिले. याशिवाय, बेन डकेटने 94 चेंडूंत 62 तर जो रुटने 58 चेंडूंत 28 धावा केल्या.
तत्पूर्वी, या लढतीत भारताने दुसर्या दिवशी 3 बाद 359 या मागील धावसंख्येवरून डावाला पुढे सुरुवात केली आणि त्यानंतर गिल आणि पंतने संयमी खेळी करत संघाची धावसंख्या 430 पर्यंत नेली. गिलने कर्णधार म्हणून पदार्पणातच 147 धावांची भक्कम खेळी केली, तर पंतने आपले सातवे कसोटी शतक अगदी थाटात साजरे केले. शतक साजरे केल्यानंतर त्याचे निखळ सेलेब्रेशनदेखील तितकेच लक्षवेधी ठरले. मात्र, नंतर इंग्लंडच्या बेन स्टोक्स (4/66) आणि जोश टंग (4/86) यांनी भारताच्या शेवटच्या फळीला झटपट गुंडाळले होते.
दणकेबाज फलंदाजीमुळे भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात एकवेळ 102 षटकांच्या मध्यापर्यंत 4 बाद 430 धावांची आतषबाजी करत मोठ्या धावसंख्येचे आपले इरादे अधोरेखित केले होते. मात्र, येथूनच भारतीय फलंदाजीची जणू पत्त्याचा बंगला कोसळत राहावा, तशी पडझड होत राहिली आणि पाहता पाहता भारताचा डाव यामुळे 4 बाद 430 वरून सर्वबाद 471 असा गडगडला. या पडझडीत गिल, पंत या शतकवीरांचाही समावेश राहिला. करुण नायर (0), रवींद्र जडेजा (11), शार्दूल ठाकूर (1), जसप्रीत बुमराह (0), प्रसिद्ध कृष्णा (1) यांनी तर सपशेल निराशा केली.
3 पंतने कसोटीत 3 वेळा षटकार मारून आपले शतक पूर्ण केले आहे आणि हे तिन्ही वेळा इंग्लंडविरुद्धच घडले आहे - 2018 मध्ये ओव्हल येथे आदिल रशीदविरुद्ध, 2021 मध्ये अहमदाबादमध्ये जो रूटविरुद्ध आणि आता लीडस्मध्ये शोएब बशीरविरुद्ध. भारतीयांमध्ये फक्त सचिन तेंडुलकर (6) आणि रोहित शर्मा (3) यांनीच पंत इतक्या वेळा कसोटी क्रिकेटमध्ये षटकार मारून शतक पूर्ण केले आहे.
147 शुभमन गिलने येथे केलेली 147 धावांची खेळी कर्णधार म्हणून पदार्पणात भारतीय फलंदाजाने केलेली ही दुसरी सर्वोच्च आहे. या यादीत विजय हजारे (1951 मध्ये इंग्लंडविरुद्ध 164*) अव्वल स्थानी आहेत.
5 परदेशातील कसोटी डावात तीन (किंवा अधिक) भारतीय फलंदाजांनी शतके झळकावण्याची ही 5 वी वेळ आहे. याआधी 2007 मध्ये मिरपूर येथे बांगला देशविरुद्ध अशी कामगिरी झाली होती. 2018 नंतर प्रथमच भारताच्या तीन किंवा अधिक फलंदाजांनी कसोटी डावात शतके झळकावली आहेत.